लोकसहभागातून स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक

वार्ताहर /काकती
काकती, होनगा येथील राष्ट्रीय महामार्ग, सर्व्हिस रस्ता परिसरात ठिकठिकाणी कचऱयामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यातून मार्गक्रमण करणाऱया नागरिक व प्रवासीवर्गाला दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. काकती, होनगा ग्राम पंचायतीने स्वच्छता मोहीम राबवून कचरा टाकणाऱयांवर कठोर निर्बंध घालणे आवश्यक आहे. लोकसहभागातून कचरा टाकणार नाही व कचरा टाकू देणार नाही, याचे पालन होणे आवश्यक झाले आहे.
येथील राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून गेली 14 वर्षे सर्व्हिस रस्त्यात कागद, प्लास्टिक बॅग, घन व ओला कचरा टाकण्यात येत आहे. काकती येथील गावकरी धाबा ते होनगा येथील लक्ष्मी धाबापर्यंत ठिकठिकाणी कचऱयाचे साम्राज्य पसरले आहे. काकतीत मुत्तेनट्टी क्रॉस, स्मशानभूमी, राष्ट्रीय महामार्ग गटारी ते मार्कंडेय नदी तर होनगा जनता कॉलनी, शांतीनगर आदी ठिकाणच्या सर्व्हिस रस्त्यात मोठय़ा प्रमाणात कचरा टाकण्यात आला आहे.
या सर्व्हिस रस्त्यातून मार्गक्रमण करणाऱया टू व्हीलर व फोर व्हीलर गाडय़ांच्या चाकात प्लास्टिक, टाकाऊ वस्तू, हॉटेल, खानावळीतील नासलेले अन्नपदार्थ, भाजीपाल्याचा ओला कचरा यामुळे दुर्गंधी पसरत आहे. यांचा नाहक त्रास मार्गक्रमण करणाऱयांना होत आहे.
काकती, होनगा ग्राम पंचायतीने स्वच्छतेसाठी केलेला प्रयास
या दोन्ही ग्रा. पं. नी स्वच्छ भारत अभियानांतर्गत ऑक्टोबर 2014 ते 2019 पर्यंत राष्ट्रीय महामार्ग या सर्व्हिस रस्त्यावरील केरकचरा उचलणे, जागृती करणे आदी कार्यक्रम राबविले. कचरा टाकताना दिसल्यास 500 रुपये दंड आदी उपक्रम राबविले. मात्र, लोकसहभागाची साथ मिळत नसल्याने स्वच्छ भारत अभियानची मोहीम यशस्वी होऊ शकली नाही.
सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रयत्नही विफल
सामाजिक कार्यकर्ते गणपत सुरेकर, ग्रा. पं. सदस्य दादू सूर्यवंशी, गजानन गव्हाणे, विनायक पाटील, विनायक केसरकर, सागर चौगुले आदी कार्यकर्ते व त्यांच्या सहकाऱयांनी स्वच्छता मोहिमा राबविल्या होत्या. पुन्हा प्रयत्नपूर्वक स्वच्छता कार्यक्रम यशस्वी करणे गरजेचे आहे.
काकती, होनगा ग्रा. पं. माध्यमातून लोकसहभाग
या दोन्ही ग्रा. पं. माध्यमातून श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचमंडळ, श्री काळभैरवनाथ देवस्थान पंच कमिटी, सेवाभावी व स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, महिला मंडळ व बचत गट, रोजगार हमी योजनेतील कामगार वर्ग, सर्व्हिस रस्त्यावरील हॉटेल, खानावळी व आस्थापने आदी कचरा निर्मूलनाची चळवळ उभी करणे आवश्यक आहे. ग्रा. पं. ने परवाना दिलेल्या सर्व आस्थापनांनी कचरा टाकण्यासाठी कचरा बॉक्सची यंत्रणा राबविण्याकरिता ग्रा. पं. ने कडक निर्बंध घालावेत.
आपल्या गावातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, नदी, नाले स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी, सामाजिक भान ठेवून आपले गाव स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी योगदान देणे आवश्यक आहे.









