खरीप हंगामाकरिता सवलतीच्या दरात बी-बियाणे उपलब्ध : शेतकऱयांनी लाभ घेण्याचे आवाहन
वार्ताहर / काकती
येथील कृषी रयत संपर्क केंद्रात राज्य बीज महामंडळाकडून यंदाच्या खरीप हंगामाकरिता सवलतीच्या दरात बी-बियाणे उपलब्ध करण्यात आली आहेत. जि. पं. सदस्य सिद्दगौडा सुणगार यांच्या हस्ते नुकताच वितरणाचा शुभारंभ करण्यात आला.
बी-बियाणे वितरण कार्यक्रमात ग्राम पंचायत अध्यक्ष सुनील सुणगार, उपाध्यक्षा वर्षा मुचंडीकर, रयत केंद्राचे प्रमुख कृषी अधिकारी अरुण कापशी, आर. डी. गुडीमनी, के. एस. कब्बूर, एस. वाय. गिऱयाळ, ए. ए. मुकन्नावर, विभागीय साहाय्यक सविता परीट, वीणा कुंभार, सुरेश गवी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सुणगार म्हणाले, यंदा मार्च महिन्यापासून सोयाबीनचा भाव दुपटीने वाढला असून सुगी हंगामात रुपये 3500 प्रति क्विंटल भाव होतो. ता 7000 ते 7500 रुपये झाला आहे. खाद्यतेलाचा तुटवडा असल्याने निश्चित सोयाबीनला चांगला भाव मिळतो. याचा लाभ घेण्याकरिता सोयाबीनची लागवड अधिक करावी. सोयाबीनचा मुबलक साठा उपलब्ध आहे, असे सुणगार यांनी प्रतिपादन केले. घरचे सोयाबीन, भात, भुईमूग, ज्वारी आदी बियाणे जिवाणू संवर्धकेयुक्त असून त्यांचा बिजोपचार केल्यास उगवण चांगली होते, असे मार्गदर्शन कृषी अधिकारी अरुण कापशी यांनी
केले.
सोयाबीन जे एस 335 जातीच्या बियाणाची 30 किलो बॅगची मूळ किंमत 3120 रु., सामान्यांसाठी ती सवलतीच्या दरात रुपये 2370 रु., मागासवर्गियांसाठी 1995 रु. आहे. भात आयआर 64 जातीच्या बियाणाची 25 किलो वजन असलेल्या बॅगची मूळ किंमत 750 रु. असून सामान्यांसाठी ती रुपये 550 रु. व मागासवर्गीयांसाठी 450 रु. दरात उपलब्ध आहे. भात बीपीटी 5204 वाणाच्या 25 किलो वजनाच्या बॅगची मूळ किंमत 800 रु. असून सामान्यांसाठी ती सवलतीत 600 रु., तर मागासवर्गियांसाठी 500 रुपये किमतीत उपलब्ध आहे. मका- कावेरी 517 प्रति 4 किलोचे पाकीट मूळ किंमत 504 रु., सामान्यांकरिता 424 रु., मागासवर्गीयांसाठी 384 रुपये आहे. कावेरी 55- 4 किलोचे पाकीट मूळ किंमत 1096 रु., सामान्यांसाठी 1016 रु., मागासवर्गियांसाठी 1084 रुपये, जीके 3059- 4 किलोचे पाकीट मूळ किंमत 1080 रु., सामान्यांसाठी 1000 रु., मागासवर्गियांसाठी 960 रु. तर जीके 3015- 4 किलोचे पाकीट मूळ किंमत 660 रु., सामान्यांसाठी 580 रु. व मागासवर्गियांसाठी 540 रुपये आदी प्रमाणित बियाणांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









