शहराला पुरवठा करण्याच्या तयारीत असताना कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊनच्या काळात गावठी दारूचा पुरवठा वाढला आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन अबकारी व पोलीस दलाने गावठी दारुविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे. मंगळवारी पहाटे काकती पोलिसांनी सुमारे 40 टय़ूबमध्ये साठवून ठेवलेला गावठी दारू नष्ट केली आहे.
काकती गावापासून जवळच महामार्गालगत रबरी टय़ुबमधून गावठी दारूचा साठा ठेवण्यात आला होता. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा साठा बेळगाव शहरात पाठविण्याची तयारी सुरू होती. याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकून दारूसाठा नष्ट केला.
पोलिसांनी छापा टाकताच दारू वाहतूक करण्यासाठी जमलेले 10 हून अधिक जण तेथून फरारी झाले. जर पोलिसांनी छापा टाकले तर त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांनी आपल्याजवळ शस्त्रेही ठेवली होती. दारू वाहतूक करण्यासाठी जमलेले तरुण मुत्य़ानट्टी गावचे असल्याचे समजले असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.









