बैठकीचे वार्तांकन करण्यास केला अटकाव : जनतेच्या हक्काची पायमल्ली करण्याचा प्रयत्न
वार्ताहर /काकती
काकती ग्राम पंचायतीची मासिक बैठक नुकतीच पार पडली. अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष सुनील सुणगार होते. यावेळी ग्राम पंचायतवतीने राबविण्यात येणाऱया विविध विकासकामांसंबंधीची माहिती बैठकीत देण्यात आली. मात्र, या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या वार्ताहराला एका ग्राम पंचायत सदस्याने हाकलून देण्याचा केलेला अश्लाघ्य प्रयत्न त्याच्या चांगलाच अंगलट आला.
बैठकीच्या कामकाजाची जनतेला माहिती व्हावी, यासाठी माहिती आणि फोटो काढू पाहणाऱया वार्ताहराला ग्रा. पं. सदस्य सिद्दीक अंकलगी याने आडकाठी केली. ‘येथे फोटो काढू नका, बाहेर जा’ अशी अरेरावी त्याने यावेळी केली. मात्र, त्याची ही मग्रुरी पाहून उपस्थित वार्ताहराने त्याला चांगलेच फैलावर घेतले. जनतेच्या मतावर निवडून येऊन जनतेलाच बाहेरचा रस्ता दाखविणारे तुम्ही कोण?, तुम्हाला तुमच्या पदाचा माज चढला आहे का?, बैठकीच्या कामकाजाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविली तर वार्ताहराचे काय चुकले? असा जाब त्याला विचारताच तो निरुत्तर झाला.
त्यानंतर बैठकीच्या कामकाजाला सुरळीत सुरुवात झाली. यावेळी जलजीवन मिशन योजनेविषयी माहिती देताना पर्यवेक्षक गुरुराज गुळी म्हणाले, ही योजना 4 कोटी 55 लाखांची आहे. या अंतर्गत 2 लाख लिटर व 1 लाख लिटर अशा दोन ओव्हरहेड टँकद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. हे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
या बैठकीत तालुका आरोग्य कार्यालयाच्यावतीने क्षयरोग (टीबी) उपचार विभागाचे पर्यवेक्षक सुरेश हंपण्णावर यांनी क्षयरोगाविषयी माहिती देताना हा संसर्गजन्य रोग असून रुग्णाच्या खोकला व शिंका हवेच्या माध्यमातून टीबीचे विषाणू पसरवतात, असे सांगितले.
क्षयाचे रुग्ण योग्य उपचारांती सहा ते नऊ महिन्यात पूर्णपणे बरे होतात. शिवाय उपचाराधीन रुग्णांना पौष्टिक आहारासाठी प्रतिमहिना 500 रुपये साहाय्यधन दिले जाते. एखाद्याला टीबीचा त्रास असेल त्यांना ग्राम पंचायतीने आपल्याकडे उपचारासाठी पाठवून द्यावे किंवा 8971849290 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सुरेश हंपण्णावर यांनी केले.
यावेळी बैठकीत गावातील कचरा निर्मूलनासाठी विशेष योजना हाती घेण्यात येणार असल्याची माहिती ग्रा. पं. अध्यक्ष सुनील सुणगार यांनी दिली. स्वच्छ गाव सुंदर गाव बनविण्यासाठी घरोघरी बकेट मोफत देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सुका व ओला कचरा, प्लास्टिक, काचा यांचे वर्गीकरण करून सेंद्रिय खत निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती सुणगार यांनी दिली.
ग्राम विकास अधिकाऱयांनी स्वागत केले. व्यासपीठावर उपाध्यक्षा वर्षा मुचंडीकर, सचिव ए. आय. हावनगोळ उपस्थित होते. बैठकीला ग्रा. पं. सदस्य, महिला सदस्या, ग्रामस्थ उपस्थित होते. आभार सचिव ए. आय. हावनगोळ यांनी मानले.