राधिका सांबरेकर / बेळगाव
कोजागरी पौर्णिमेपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत चालणाऱया काकड आरतीच्या गजराला आजपासून प्रारंभ होणार आहे. वारकरी संप्रदायात फार पूर्वीपासून काकड आरतीची परंपरा जोपासली जात आहे. यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातील विठ्ठल-रखुमाई मंदिरांमध्ये काकडारतीचे सूर ऐकायला मिळणार आहेत. मात्र कोरोनामुळे काकड आरतीच्या सार्वजनिक स्वरुपाला मर्यादा आली आहे. एक महिना चालणारा हा उत्सव निद्रिस्त देवतांना जागविण्यासाठी केला जातो अशी समजूत असून टाळ, मृदुंग चिपळीच्या तालावर भजनाने काकडाला प्रारंभ होतो. सुती धोतराचे तुपातील काकडे बनवून त्याची आरती केली जाते. यामुळे आजपासून जय जय राम कृष्ण हरी तसेच विठुनामाच्या गजरात या सोहळय़ाला सुरुवात होणार आहे.
अश्विन पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत काकड आरतीचे आयोजन केले जाते. पहाटे पाचपासून या सोहळय़ाला सुरुवात होते. प्रारंभी काकडांनी आरती केली जाते. यानंतर देवदेवंताना स्नान घालून पंचामृतांनी महाभिषेक केला जातो. आरती करून प्रसादाचे वितरण केले जाते. यामुळे काकड आरतीच्या कार्यक्रमात सांप्रदायिक भजनी मंडळाच्या सहभागाबरोबरच मंदिर ट्रस्टी, पुजारी तसेच आसपासच्या भक्तामंडळांचा तसेच महिलावर्ग आरती घेऊन सदर कार्यक्रमाला उपस्थित राहतात. मात्र यंदा कोरोना काकड आरतीच्या सामुहिकतेला लॉक करणारा ठरला आहे. भक्तांचे आरोग्य व सुरक्षितता यांचा विचार घेऊन शहरातील मंदिरांनी सामुहिक स्वरुपात काकडा न करता मर्यादित लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा करण्याचे ठरवले आहे. कोविड-19 च्या मार्गसूचीचा अवलंब करून काकड आरती पार पडल्यानंतर भक्तांसाठी मंदिर खुले करण्यात येणार आहे.
शहरातील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात काकड आरतीची परंपरा आणि कोविड-19 मध्ये त्याची जोपासना याचा आढावा घेतला असता त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
प्रथेनुसार काकडा पार पडणारसांप्रदायिक भजनी मंडळ, बापट गल्ली
बापट गल्ली येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात 30 वर्षांपासून काकड आरतीची परंपरा जोपासली जात आहे. कोजागरी पौर्णिमेला चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवून दुसऱया दिवसापासून काकडाला सुरुवात होते. भव्य मंडप, दिव्याची रोषणाई, भक्तांच्या सहभागातून प्रसादाच्या वितरणातून सोहळा पार पडतो. मात्र यंदा सभा मंडप अथवा सामुहिक स्वरुपात काकडा न करता, कालाकीर्तन, आवळी भोजन न करता प्रथेनुसार काकडा पार पडणार आहे. वयस्कर मंडळींनी काकडाला उपस्थित राहू नये, तसेच मास्कचा वापर अनिवार्य असल्याची माहिती अध्यक्ष श्रीकांत सांबरेकर व सेक्रेटरी प्रभाकर कणबर्गी यांनी दिली.
श्री नामदेव दैवकी संस्था, खडेबाजार
खडेबाजार येथील नामदेव दैवकी संस्थेच्या मंदिरात काकडाची 35 वर्षांची परंपरा आहे. यंदा कोरोनाचे संकट विचारात घेऊन सामाजिक अंतराचे भान राखत, मास्कचा वापर करून हा सोहळा पार पडणार आहे. गर्दी टाळता यावी यासाठी सार्वजनिक स्वरुपाच्या काकडारती न करता युवावर्गाकडून परंपरेची जोपासना करत हा सोहळा पार पडणार असल्याचे अध्यक्ष राम हावळ, सेक्रेटरी विठ्ठल काकडे यांनी सांगितले.
केवळ 20 लोकांच्या उपस्थितीत काकडआरती होणार
-राई रखुमाबाई विठ्ठल मंदिर, शहापूर (पुरातन श्ऱी विठ्ठल रखुमाई मंदिर)
अति पुरातन असणाऱया या मंदिराची सेवा देऊळकर कुटुंबाकडून सुरू आहे. या मंदिरात काकड आरतीचा सोहळा मोठय़ा प्रमाणात होतो. 150 ते 200 लोकांच्या उपस्थितील महिनाभर हा सोहळा पार पडतो. मात्र यंदा कोरोनाच्या संकटात आरतीचे सार्वजनिक स्वरूप, प्रसादाचे वितरण, भव्य स्वरुपातील रथयात्रा न काढता दररोज केवळ 20 लोकांच्या उपस्थितीत काकडआरती होणार असल्याचे देवस्थान कमिटीतर्फे ठरविण्यात आले आहे. यावेळी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवण्यात येणार असून काकड आरतीनंतर प्रवेशद्वार खुले करण्यात येईल. हेरंब देऊळकर व मंदार देऊळकर यांच्या व्यवस्थेखाली सदर सोहळा पार पडणार आहे.
भजनी मंडळ, मंदिर ट्रस्टींच्या उपस्थितीत सोहळा होणार
नामेदव विठ्ठल मंदिर, शहापूर,
काकड आरतीची परंपरा 80 वर्षांपासूनची आहे. 200 ते 250 लोकांच्या उपस्थितीत दरवर्षी हा सोहळा पार पडतो. मात्र यंदा कोविडचा प्रादुर्भाव विचारात घेऊन कमीत कमी भक्त मंडळींच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने काकडा होणार आहे. भजनी मंडळ, मंदिराचे ट्रस्टी यांच्या उपस्थितीत मोजक्या भक्तांच्या सहकार्यातून हा सोहळा होणार असल्याचे अध्यक्ष सतीश हावळ आणि राजन काकडे यांनी सांगितले.
कोरोनाचे संकट ओळखून भक्तांनी गर्दी करू नये
श्री ज्ञानेश्वर माउली विठ्ठल-रखुमाई मंदिर, महाद्वार रोड तिसरा क्रॉस
काकड आरतीची परंपरा मागील 25 वर्षांची आहे. मंदिरात नित्यनेमाने पूजाअर्चा करण्यात येते. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव ओळखून केवळ 25 जणांच्या उपस्थितीत काकडाचा सोहळा पार पडणार आहे. विणेकरी, मृदुंगधारी, 6 टाळकरी, मंदिर ट्रस्टी आणि सेवेकरी महिलांच्या उपस्थितीत काकडा आरती होईल. सामाजिक अंतर राखले जावे तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने यंदा प्रसादाचे वितरण करण्यात येणार नाही. कोरोनाचे संकट ओळखून भक्तांनी गर्दी करू नये, असे आवाहन अध्यक्ष मारुती जोशीलकर तसेच सेक्रेटरी पांडुरंग जाधव यांनी केले आहे.
यंदा भक्तांचा होणार हिरमोड
काकड आरतीच्या निमित्ताने गल्लोगल्लीतील मंदिरांमध्ये घुमणाऱया विठुनामाच्या गजरात गल्लीतील वरिष्ठ मंडळी तसेच बालचमू, महिलावर्ग यांचा सहभाग खूप मोठा असतो. काकडाचे सूर कानी पडताच भक्तांची पावले मंदिराकडे वळतात. यामुळे पहाटे उठण्याची सवय लागते, तसेच पहाटेची हवा शुद्ध असल्याने आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत होते. यामुळे काकड आरतीचा लाभ घेणाऱयांची संख्या मोठी आहे. मात्र यंदा मंदिर व्यवस्थापनाने धोका ओळखून मर्यादित स्वरुपात काकड आरतीचे आयोजन केले आहे. यामुळे विठुनामाच्या गजरात रमणाऱया भक्तांना या उपक्रमात सहभागी होता येणार नाही.









