विश्व कसोटी चॅम्पियनशिप फायनल – रहाणेचे अर्धशतक हुकले, वॅग्नर-बोल्टचे प्रत्येकी 2 बळी
वृत्तसंस्था/ साऊदम्प्टन
काईल जेमीसन, नील वॅग्नर व ट्रेंट बोल्ट यांनी केलेल्या भेदक माऱयामुळे न्यूझीलंडने विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीत भारताचा पहिला डाव 217 धावांत संपुष्टात आणला. दुसरा नवा चेंडू घेतल्यानंतर भारताचा डाव 4 बाद 149 वरून सर्व बाद 217 असा गडगडला. जेमीसनने 5 बळी मिळविले.
या कसोटीच्या तिसऱया दिवशी भारताने 3 बाद 146 या धावसंख्येवरून पुढे सुरुवात केली. पण पहिल्या सत्रात 4 गडय़ांच्या बदल्यात भारताला केवळ 65 धावांची भर घालता आली. ढगाळ वातावरण असल्याने जलद गोलंदाजीस अनुकूल ठरलेल्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठीण जात होते. या वातावरणाचा लाभ उठवत जेमीसन, बोल्ट व वॅग्नर यांनी सीम, स्विंग व उसळत्या चेंडूवर भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले. कर्णधार कोहलीला आदल्या दिवशीच्या धावसंख्येत एका धावेचीही भर घालता आली नाही. त्याला ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकत मोहात अडकवण्याचा प्रयत्न किवी गोलंदाज करीत होते. पण कोहली ते सोडून देत होता. जेमीसनने मध्येच एक चेंडू कोहलीच्या बूट लेसच्या दिशेने टाकला आणि त्यावर कोहली पायचीत झाला. त्याने डीआरएस घेतला, पण त्यातही पंचांचा निर्णय कायम राहिला. त्याने 132 चेंडूत एका चौकारासह 44 धावा जमविल्या. त्याने उपकर्णधार रहाणेसमवेत 61 धावांची भागीदारी केली. रिषभ पंतला 19 चेंडूत एकही धाव काढता आली नव्हती. नंतर त्याने फ्लिकचा चौकार मारला आणि दोन चेंडूनंतर जेमीसनला ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात तिसऱया स्लिपमध्ये लॅथमकरवी तो झेलबाद झाला.
रहाणेचे अर्धशतक हुकले

रहाणेने धावगती वाढविण्यासाठी काही फटके मारण्यास सुरुवात केली. मात्र वॅग्नरच्या जाळय़ात तो अडकला. त्याच्या एका चेंडूवर त्याने पुलचा फटका मारला. त्यावर तो सुदैवानेच बचावला होता. पण पुढच्याच चेंडूवर तसाच फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि मिडविकेटवर लॅथमने त्याचा सोपा झेल टिपला. रहाणेने 117 चेंडूत 5 चौकारांसह 49 धावा जमविल्या. यानंतर आर. अश्विनने टोलेबाजी करीत 27 चेंडूत 3 चौकारासह उपयुक्त 22 धावा फटकावल्या. पण साऊदीने त्याची खेळी संपुष्टात आणली. जेमीसनने इशांत शर्मा व बुमराह यांना बाद करीत पाचवा बळी मिळविला. 5 किंवा त्याहून जास्त बळी मिळविण्याची त्याची ही पाचवी वेळ आहे. 93 व्या षटकात बोल्टने जडेजाला यष्टिरक्षक वॅटलिंगकरवी झेलबाद करीत भारताचा पहिला डाव 217 धावांत संपुष्टात आणला. या सामन्यात लॅथमने तीन झेल टिपले. जेमीसनने 31 धावांत 5, वॅग्नरने 40 धावांत 2, बोल्टने 47 धावांत 2 आणि साऊदीने एक बळी मिळविला.
न्यूझीलंडची सावध सुरुवात
न्यूझीलंडने आपल्या डावाला सावध सुरुवात केली. 10.1 षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसास सुरुवात झाल्यामुळे काही वेळ खेळ थांबवावा लागला. यावेळी न्यूझीलंडने बिनबाद 19 धावा जमविल्या होत्या. पण लगेच पाऊस थांबल्याने काही मिनिटातच खेळ पुढे सुरू झाला. भारताच्या शमी व बुमराह यांनी शिस्तबद्ध मारा केला. पण त्यांना न्यूझीलंडच्या गोलंदाजांइतका स्विंग मिळविता आला नाही. मात्र सीम मुव्हमेंट चांगली मिळाल्याने लॅथम व कॉनवे वारंवार चकत होते. पण चहापानापर्यंत दोघेही 21 षटके विकेट राखण्यात यशस्वी ठरले. यावेळी न्यूझीलंडने बिनबाद 36 धावा जमविल्या होत्या. कॉनवे 18 व लॅथम 17 धावांवर खेळत होते.
संक्षिप्त धावफलक ः भारत प.डाव 92.1 षटकांत सर्व बाद 217 ः रोहित शर्मा 34 (68 चेंडूत 6 चौकार), गिल 28 (64 चेंडूत 3 चौकार), पुजारा 8, कोहली 44 (132 चेंडूत 1 चौकार), रहाणे 49 (117 चेंडूत 5 चौकार), पंत 4, जडेजा 15 (2 चौकार), अश्विन 22 (27 चेंडूत 3 चौकार), इशांत 4, बुमराह 0, शमी नाबाद 4, अवांतर 5. गोलंदाजी ः जेमीसन 5-31, वॅग्नर 2-40, बोल्ट 2-47, साऊदी 1-64, ग्रँडहोम 0-32
न्यूझीलंड प.डाव (चहापानापर्यंत) ः 21 षटकांत बिनबाद 36 ः कॉनवे खेळत आहे 18 (56 चेंडूत 3 चौकार), लॅथम खेळत आहे 17 (70 चेंडूत 1 चौकार), अवांतर 1. गोलंदाजी ः इशांत 0-8, बुमराह 0-10, शमी 0-14, अश्विन 0-3.









