सौंदलगा येथील शेतकऱयाचा यशस्वी प्रयोग
कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध अशी ओळख सौंदलगा या गावाने संपूर्ण देशभरात मिळविली आहे. कांदा उत्पादनातून येथील शेतकऱयांनी आर्थिक प्रगतीची दिशा धरली आहे. कांदा लागवडीतून कांदा तरु व बियाणांची मागणी वाढत असल्याचे लक्षात घेऊन येथील अनेक शेतकऱयांनी कांदा बियाणे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आदर्श निर्माण करताना प्रगतशील शेतकरी केदारी बाळकृष्ण माळी यांनी यंदा भरघोस उत्पन्न घेतले आहे.
शेती व्यवसाय हा सध्या आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे. पण शेती व्यवसाय हा पारंपरिक पद्धत व आधुनिकतेची सांगड घातली तरच यशस्वी होऊ शकतो. हे अनेक प्रयोगशील शेतकऱयांनी उत्पादन घेताना सिद्ध केले आहे. हाच विचार घेऊन केदारी माळी यांनी कांदा बी उत्पादनाकडे लक्ष केंद्रीत केले. गेल्या काही वर्षात प्रयोगशील शेती व्यवसाय करताना यशस्वी ठरले आहेत. यंदा त्यांनी 6 गुंठय़ात कांदा बी उत्पादन घेतले असून वाढलेले उत्पादन लक्षात घेता 1 लाखाचे उत्पन्न निश्चित मिळेल, असा विश्वास माळी यांनी व्यक्त केला.
गारवा जातीच्या या कांदा बी उत्पादनासाठी माळी यांनी शिवाराची नांगरट करून मशागत केली. नोव्हेंबरअखेर 30 किलो कांदा लागवड केली. यावेळी कांदा दर तेजीत असल्याने बियांणासाठी लागणारा कांदा 60 रुपये किलोप्रमाणे मिळाला.
लागवडीनंतर औषध फवारणी व नियमित पाणी
देत उत्पादन चांगलेच वाढले. यातून 50 ते
60 किलो कांदा बी मिळणार आहे. बाजारात
1500 ते 2 हजार रुपये प्रतिकिलो दराने कांदा बी
विकले जाते. यामुळेच सुमारे 1 लाखापर्यंत
उत्पन्न मिळेल, असे माळी यांनी
सांगितले.
शेती व्यवसाय करताना प्रत्येक शेतकऱयाने प्रयोगशील शेती केली पाहिजे. पण त्याचबरोबर उत्पादन घेताना बाजारपेठेतील मागणीचा विचारही प्राधान्याने केला पाहिजे. बाजारपेठेत उत्पादीत माल विक्री स्वतःहून करण्याची तयारी ठेवली पाहिजे. यामुळे शेती व्यवसाय कधीही नुकसानीत येणार नाही, असे केदारी माळी यांनी स्पष्ट केले.
महेश शिंपुकडे, निपाणी