तिसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया 12 धावांनी विजयी
सिडनी / वृत्तसंस्था
‘जिनियस’ विराट कोहलीशी झुंजत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी क्लीन स्वीपच्या प्रयत्नांना मंगळवारी तिसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यात 12 धावांनी सुरुंग लावला. भारताने तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली असून या निकालासह मर्यादित षटकांच्या मालिकेचा हिशेब बरोबरीत राहिला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका 2-1 अशाच फरकाने जिंकली होती.
सिडनीतील एससीजी मैदानावर संपन्न झालेल्या तिसऱया लढतीत ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 5 बाद 186 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात भारताला 7 बाद 174 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्वेप्सन (23 धावात 3 बळी) सामनावीर तर हार्दिक पंडय़ा मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या निकालासह भारताची टी-20 प्रकारातील सलग 10 विजयांची परंपरा खंडित झाली.
विजयासाठी 187 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार कोहलीला थोडीथोडकी नव्हे तर 4 जीवदाने लाभली आणि याचा पुरेपूर लाभ घेत विराटने 61 चेंडूत 85 धावांची झुंजार खेळी साकारली. पण, यानंतरही भारताला निर्धारित 20 षटकात 7 बाद 174 धावांवरच समाधान मानावे लागले.
हार्दिक पंडय़ाने या लढतीत देखील 13 चेंडूत जलद 20 धावांसह आक्रमक खेळाचे इरादे स्पष्ट केले होते. पण, ऍडम झाम्पाने (3 षटकात 1-21) त्याचा महत्त्वाचा अडसर दूर केला. झाम्पाच्या लेगब्रेकवर उत्तूंग फटका मारण्याच्या प्रयत्नात पंडय़ाने शॉर्ट थर्डमॅनवरील फिंचकडे सोपा झेल दिला. पंडय़ा बाद झाल्यानंतर प्रामुख्याने कोहलीवर दडपण होते आणि धावसंख्येचा पाठलाग करताना विराटच्या वाटय़ाला क्वचितच अपयश येते, तसे ते येथे आले.
विराटच्या झुंजार खेळीत 4 चौकार व 3 उत्तूंग षटकारांचा समावेश राहिला. त्याला बरीच जीवदानेही मिळाली. प्रारंभी, स्टीव्ह स्मिथने डीप मिडविकेटवर सोपा झेल सांडला तर सीन ऍबॉटला परतीचा कठीण झेल टिपता आला नाही. नंतरच्या टप्प्यात मॅथ्यू वेडने यष्टीचीतची सोपी संधी दवडली. विराटने नंतर दौऱयातील आपले तिसरे अर्धशतक साजरे केले. ऍबॉटला षटकार खेचत त्याने हा माईलस्टोन सर केला. अर्थात, नंतर सामनावीर मिशेल स्वेप्सनच्या (3-23) लेगब्रेक गोलंदाजीवर भारतीय फलंदाज सातत्याने चाचपडत राहिले.
स्वेप्सन सलामीवीर धवनला (21 चेंडूत 28) हाफ ट्रकरवर तर संजू सॅमसनला (10) लो फुलटॉसवर बाद करण्यात यशस्वी झाल्याने बराच सुदैवी ठरला. श्रेयस अय्यरला बाद केले, तो त्याचा या लढतीतील सर्वोत्तम चेंडू ठरला. पंडय़ाने सेट होण्यास बराच वेळ घेतला, ते पाहता विराटने स्वतः आक्रमणाला सुरुवात केली. नंतर झाम्पाने पंडय़ाला बाद करणे ऑस्ट्रेलियन संघासाठी टर्निंग पॉईंट ठरले.
वेड-मॅक्सवेलची फटकेबाजी
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या डावात मॅथ्यू वेडचे सलग दुसरे अर्धशतक व मॅक्सवेलची फटकेबाजी मुख्य आकर्षण केंद्र ठरले. वेडने 53 चेंडूतच 7 चौकार व 2 षटकारांसह 80 धावा झोडपल्या तर मॅक्सवेलने चौफेर फटकेबाजी करताना 36 चेंडूत 3 चौकार व तितक्याच षटकारांसह 54 धावा वसूल केल्या. या उभयतांच्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाला 5 बाद 186 धावांपर्यंत सहज मजल मारता आली.
प्रारंभी बरेच झगडणाऱया मॅक्सवेलने शेवटच्या 6 षटकात तुफानी फटकेबाजी करताना मॅथ्यू वेडसमवेत तिसऱया गडय़ासाठी 90 धावांची दमदार भागीदारीही साकारली. भारतीय संघातर्फे वॉशिंग्टन सुंदर (4 षटकात 2-34), थंगसरु नटराजन (4 षटकात 1-33) गोलंदाजीतील हिरो ठरले. नटराजनला शेवटच्या षटकात काही चौकार बहाल कराव्या लागल्या असल्या तरी त्याने त्यापूर्वी नियंत्रित टप्प्यावर मारा केला होता. ऑस्ट्रेलियाने 13 ते 18 या 6 षटकात 68 धावा वसूल केल्या. भारताचे खराब क्षेत्ररक्षण देखील यजमान संघाच्या पथ्यावरच पडले. क्षेत्ररक्षकांनी जे झेल सांडले, त्याचा शार्दुलला अधिक फटका बसला.
धावफलक
ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू वेड पायचीत गो. ठाकुर 80 (53 चेंडूत 7 चौकार, 2 षटकार), ऍरॉन फिंच झे. पंडय़ा, गो. वॉशिंग्टन सुंदर 0 (2 चेंडू), स्टीव्ह स्मिथ त्रि. गो. वॉशिंग्टन सुंदर 24 (23 चेंडूत 1 चौकार), ग्लेन मॅक्सवेल त्रि. गो. नटराजन 54 (36 चेंडूत 3 चौकार, 3 षटकार), हेन्रिक्स नाबाद 5 (2 चेंडूत 1 चौकार), डॅर्सी शॉर्ट धावचीत (बदली खेळाडू-पांडे/ राहुल) 7 (3 चेंडूत 1 चौकार), सॅम्स नाबाद 4 (2 चेंडूत 1 चौकार). अवांतर 12. एकूण 20 षटकात 5 बाद 186.
गडी बाद होण्याचा क्रम
1-14 (फिंच, 1.4), 2-79 (स्मिथ, 9.4), 3-169 (वेड, 18.2), 4-175 (मॅक्सवेल, 19.1), 5-182 (शॉर्ट, 19.4).
गोलंदाजी
दीपक चहर 4-0-34-0, वॉशिंग्टन सुंदर 4-0-34-2, टी. नटराजन 4-0-33-1, यजुवेंद्र चहल 4-0-41-0, शार्दुल ठाकुर 4-0-43-1.
भारत : केएल राहुल झे. स्मिथ, गो. मॅक्सवेल 0 (2 चेंडू), शिखर धवन झे. सॅम्स, गो. स्वेप्सन 28 (21 चेंडूत 3 चौकार), विराट कोहली झे. सॅम्स, गो. टाय 85 (61 चेंडूत 4 चौकार, 3 षटकार), संजू सॅमसन झे. स्मिथ, गो. स्वेप्सन 10 (9 चेंडू), श्रेयस अय्यर पायचीत गो. स्वेप्सन 0 (1 चेंडू), हार्दिक पंडय़ा झे. फिंच, गो. झाम्पा 20 (13 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), वॉशिंग्टन सुंदर झे. टाय, गो. ऍबॉट 7 (6 चेंडूत 1 चौकार), शार्दुल ठाकुर नाबाद 17 (7 चेंडूत 2 चौकार), दीपक चहर नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 7. एकूण 20 षटकात 7 बाद 174.
गडी बाद होण्याचा क्रम
1-0 (केएल राहुल, 0.2), 2-74 (धवन, 8.5), 3-97 (सॅमसन, 12.3), 4-100 (अय्यर, 12.6), 5-144 (पंडय़ा, 17.1), 6-151 (विराट, 18.1), 7-164 (वॉशिंग्टन सुंदर, 19.2).
गोलंदाजी
मॅक्सवेल 3-0-20-1, ऍबॉट 4-0-49-1, सॅम्स 2-0-29-0, ऍन्ड्रय़्रू टाय 4-0-31-1, स्वेप्सन 4-0-23-3, झाम्पा 3-0-21-1.









