मुख्यमंत्र्यांची काँग्रेसवर खरमरीत टीका
प्रतिनिधी /बेळगाव
काँग्रेस बेजबाबदार विरोधी पक्ष आहे, असा आरोप मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केला आहे. धर्मांतर बंदी कायद्यावर समाधानाने चर्चा न करता केवळ राजकीय राजकारणासाठी त्यांनी सभात्याग केला आहे. म्हणून ते बेजबाबदार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सुवर्ण विधानसौधमध्ये पत्रकारांशी बोलताना वादग्रस्त विषयाला बगल देण्यासाठी तुम्ही धर्मांतर बंदी कायदा मांडला आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले, गेले तीन दिवस अतिवृष्टी, अनावृष्टी, पूर आदी गंभीर विषयांवर चर्चा झाली आहे. या चर्चेवर मंगळवारी सभागृहात सरकार उत्तर देणार होते. पण ते ऐकण्याची तसदीही काँग्रेसने घेतली नाही. उत्तर कर्नाटकच्या अनेक समस्यांवर चर्चा व्हायची आहे. या चर्चेत भाग घेण्याऐवजी सभात्याग करण्यात येत आहे. केवळ धरणे, सभात्यागासाठीच ते येथे आले आहेत. सभागृहात विरोधी पक्ष जबाबदारीने वागले नाहीत. धर्मांतराचा मुद्दा ज्वलंत आहे. त्यामुळे अनेक जण त्रस्त झाले आहेत. म्हणून सरकारने हे विधेयक मांडले आहे. धर्मांतर बंदी कायद्यावर चर्चा करण्यास अवकाश आहे. असे असताना चर्चेत भाग न घेता काँग्रेसने सभात्याग केला आहे. त्यामुळेच ते बेजबाबदार विरोधी पक्ष ठरले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकार सभाध्यक्षांचा गैरवापर करीत आहे. या विरोधी पक्षाच्या आरोपांना त्यांनी उत्तर दिले नाही.









