उत्तराखंडमध्ये योगी आदित्यनाथांची प्रचारसभा
उत्तराखंडमध्ये प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भाजपच्या समर्थनार्थ पोहोचलेले उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. टिहरी गढवालमध्ये त्यांनी स्वतःच्या पहिल्या प्रचारसभेला संबोधित केले आहे.
काँग्रेस स्वतःच्या घोषणापत्रात मुस्लीम विद्यापीठ स्थापन करणार असल्याचे सांगत आहे. काँग्रेस देवभूमी उत्तराखंडची ओळख संपवू पाहत असला तरीही असे घडणार नाही. काँग्रेस स्वतः संपण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेस संपविण्यासाठी अन्य कुणाची गरज भासणार नाही, उलट भाऊबहिण मिळूनच काँग्रेस संपविण्यासाठी पुरेसे आहेत. उत्तरप्रदेशातून काँग्रेसचे अस्तित्व संपणार असल्याचे योगी यांनी म्हटले आहे.
उत्तराखंडमधील उत्साह पाहता राज्यात भाजप सरकार येणे निश्चित आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी उत्तराखंडमध्ये भाजप सरकार आवश्यक आहे. येथे प्रचंड बहुमतासह भाजप सरकार स्थापन करणार असा विश्वास आहे. आमच्या सरकारने जनरल बिपिन रावत यांचे नाव सैनिक शाळेला दिले आहे. देशाची सुरक्षा मजबूत करण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. आम्हाला त्यांच्याबद्दल गर्व असल्याचे योगी म्हणाले. हिंदू सांप्रदायिक शब्द नसून आमची सांस्कृतिक ओळख आहे. आम्ही देशाबाहेर गेल्यावर आमची ओळख याच शब्दाने होते असे उद्गार योगींनी प्रचारसभेत बोलताना काढले आहेत.
गुन्हेमुक्त झाला उत्तरप्रदेश
उत्तरप्रदेश आता गुन्हेमुक्त झाला आहे. उत्तरप्रदेशात गुन्हेगारांवर कारवाई झाल्यास ते उत्तराखंडच्या दिशने पलायन करतील याचमुळे उत्तराखंडमध्येही भाजप सरकार आवश्यक आहे. गुन्हेगारांना मी सोडत नाही, परंतु ते उत्तराखंडमध्ये पळुन आल्यास सुरक्षेसाठी भाजप सरकार आवश्यक असल्याचे योगी म्हणाले. उत्तरप्रदेशात पूर्वी दर तिसऱया दिवशी दंगल व्हायची. 2017 पूर्वी सुरक्षेची स्थिती नव्हती. परंतु भाजप सरकार आल्यावर सुरक्षा व्यवस्था मजबूत झाली. पूर्वी मुली असुरक्षित होत्या. व्यापारी पलायन करायचे. परंतु आता ही स्थिती राहिलेली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.









