वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात एफआयआर

प्रतिनिधी /बेळगाव
भरधाव टिप्परने मोटारसायकलला ठोकरल्याने काँग्रेस रोड पहिल्या रेल्वेगेटजवळ बुधवारी सकाळी झालेल्या अपघातात ब्रम्हनगर येथील एक युवक जागीच ठार झाला. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
विजय परशराम नाईक (वय 35, मूळचा रा. बहाद्दरवाडी, सध्या रा. ब्रम्हनगर) असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. बुधवारी सकाळी आपल्या मोटारसायकलवरून विजय कामाला जात होता. लक्ष्मी टेकडी येथे तो काम करीत होता. कामावर जाताना भरधाव टिप्परची मोटारसायकलला धडक बसली. या अपघातात तो जागीच ठार झाला.
त्याच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ, काका, काकू असा परिवार आहे. दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शुक्रवारी सकाळी 8 वाजता बहाद्दरवाडी येथे रक्षाविसर्जन होणार आहे.
अतिवेग नडला
काँग्रेस रोडवर सकाळी टिप्पर, ट्रक आदी अवजड वाहने भरधाव वेगाने जातात. यासंबंधी स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा पोलिसांकडे तक्रार करूनही त्याचा उपयोग झाला नाही. अवजड वाहनांचा वेग सर्वसामान्यांच्या जीवावर बेतत आहे. वाळू, विटांसह इतर मालांची वाहतूक करणारी वाहने पोलिसांना चकविण्यासाठी वेगाने जातात. त्यामुळेच या परिसरात अपघात वाढल्याचे सामोरे आले आहे.









