ऑनलाईन टीम / मुंबई
महाविकास आघाडीतील प्रमुख प्रक्ष असलेल्या कॉंग्रेसकडून गेल्या काही दिवसापासून स्वबळाचा नारा दिला जात आहे. याच स्वबळाच्या नाऱ्यावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल, शनिवारी कॉंग्रेसवर निशाणा साधला होता. शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी विरोधकांसह, मित्रपक्षांचाही समाचार घेतला होता. यातच आज शिवसेनेच्या एका आमदाराने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
ईडीची चौकशी लागल्यापासून अज्ञातवासात गेलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्रं लिहिलं आहे. या दोन पानी पत्रात त्यांनी आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करत असल्याचा दावा करत त्यांनी भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन या पत्रातून केले आहे. इतकच नाही तर, भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला याचा फायदा होईलच. शिवाय आमच्या सारख्यांना होणारा त्रासही वाचेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. 10 जून रोजी त्यांनी हे पत्रं लिहिलं आहे.
या पत्रात असे म्हटले आहे की, सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असा दावा सरनाईक यांनी केला आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविण्याचा तुम्ही शब्द दिला होता. तो पूर्ण करून दाखवला. तुम्ही पदाला न्यायही देत आहात. पण या परिस्थितीही राजकारण सुरू आहे. सत्तेत राहूनही काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते फोडत आहे. आपला पक्ष कमकुवत करत असेल तर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घेतलेले बरे. हे माझे वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या ‘लेटरबॉम्ब’नंतर आता शिवसेनेकडून या पत्रावर काय खुलासा येतो, याकडे राजकीय विश्वाचं लक्ष लागलं आहे. मात्र या लेटरबॉम्ब’नंतर भाजप नेत्यांनी या सर्व प्रकारावर जोरदार टोलेबाजी लगावली आहे.









