ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. या वाढत्या महागाईविरोधात देशभरात ३१ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान काँग्रेसने महागाईमुक्त भारत आंदोलन करणार असल्याची घोषणा शनिवारी केली. या काळात महागाईविरोधात देशभरात मोर्चे काढले जातील, निदर्शने केली जातील. पहिल्या टप्प्यात ३१ मार्च रोजी काँग्रेस कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक आपआपल्या घराबाहेर आणि सार्वजनिक ठिकाणी निदर्शने करतील. २ एप्रिल ते ४ एप्रिलदरम्यान स्वयंसेवी संस्था, धार्मिक, सामाजिक संस्था आणि रहिवासी सेवा संस्थांसह देशभरात जिल्हा स्तरावर धरणे आंदोलन आणि मोर्चे काढण्यात येतील. ७ एप्रिल रोजी सामाजिक, धार्मिक संघटना, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या मदतीने सर्व राज्यांच्या मुख्यालयांमध्ये धरणे आणि मोर्चे काढण्यात येतील.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी पक्षाचे सरचिटणीस आणि अन्य प्रमुखांशी चर्चा करून महागाईमुक्त अभियानाची घोषणा केली आहे. यातून लोकांचा आवाज बळकट केला जाईल, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही यानिमित्ताने मोदी सरकारवर टीकेचा प्रहार केला. लोक महागाईच्या ओझ्याने दबून गेले असताना राजा मात्र महालात दंग आहे, असे ते म्हणाले.
गेल्या सहा दिवसात पाच वेळा इंधन दरवाढ झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा मुद्दा पुढे करत इंधनाच्या किमती वाढवल्या जात आहेत. तर कच्च्या मालाच्या दरात झालेल्या वाढीचा बोजा तेल कंपन्यांनी ग्राहकांवर टाकला आहे. परिणामी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शनिवारी पुन्हा प्रतिलिटर ८० पैशांनी तर वाढ झाली. गेल्या पाच दिवसांत तेलाच्या किमतीत झालेली ही चौथी वाढ आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, देशातील लोकांचा मोदी सरकारने विश्वासघात केला आहे. या सरकारने सर्वसामान्य लोकांना लुटले आहे. गेल्या १३७ दिवसांत झालेल्या निवडणुकांत मते मिळावीत यासाठी पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, पीएनजी आणि सीएनजीचे दर मोदी सरकारने स्थिर ठेवले होते; पण त्यानंतर गेल्या आठवडाभरात दरवाढीमुळे लोकांची झोप उडाली आहे.