एका युवकाची दुचाकी फोडली : सहाजणांवर गुन्हाः
प्रतिनिधी/ सातारा
बसस्थानक परिसरातील मार्केटयार्ड, काँग्रेस भवन परिसर सध्या रात्रीच्या वेळी अशांत बनू लागला आहे. दि. 16 रोजी रात्री 11 वाजता सिगारेट मागितल्याच्या कारणातून तीन युवकांना सहाजणांच्या टोळक्याने मारहाण केल्याची घटना घडली असून यावेळी एका युवकाची दुचाकी दगडाने फोडली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार युवक धैर्यशील सुरेश देशमुख (वय 22, रा. कारंजकरनगर, विलासपूर, सातारा मूळ रा. नांदगाव, ता. सातारा) हा त्याचे मित्र सुशांत भोसले व ऋषीकेश घोरपडे हे दि. 16 रात्री 11 च्या सुमारास काँग्रेस भवनाशेजारी पानटपरीजवळ गेले व त्यांनी सिगारेट मागितली.
त्यावेळी तिथे असलेल्या प्रतिक नलवडे उर्फ सोन्या (रा. बोगदा), रफिक शेख व असलम शेख (दोघे रा. मोळाचा ओढा, सातारा) व अनोळखी तीन युवकांनी धैर्यशील देशमुख व त्याच्या मित्रांना सिगारेट मिळणार नाही, तुम्ही येथे का थांबलाय असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी सुशांत भोसले याची दुचाकीही या टोळक्याने दगडाने फोडली. याप्रकरणी धैर्यशील देशमुख याच्या तक्रारीनंतर सहाजणांवर गर्दी, मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार यू. एल. जाधव या गुन्हयाचा पुढील तपास करत आहेत.
मार्केटयार्ड परिसरात युवकाला लुटले
राधिका रस्त्यावरील मार्केटयार्ड परिसरात माणदेशी सहकारी बँक लि सातारा शाखेच्या समोर दुचाकीसमवेत उभा असताना तिघांनी रोख रक्कम मोबाईल व सोन्याची चैन जबरदस्तीने मारहाण करून चोरून नेल्याची घटना घडली आहे. अनोळखी तीन इसमांनी रोख रक्कम मोबाईल व सोन्याची चैन असा 12 हजार 600 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने मारहाण करून चोरून नेल्याची तक्रार रामानंद शिवनाथ रा. करंजे पेठ, भैरवनाथ मंदिराजवळ, करंजे सातारा यांनी दिली.








