प्रतिनिधी / पणजी
कपिल झवेरीच्या कोणत्याही कार्यक्रमाला भाजपचे नेते, मंत्री गेले नाहीत, असा दावा करत झवेरी याच्याशी काँग्रेस नेत्यांचे साटेलोटे असल्याचा आरोप भाजपने केला आहे. कपिल झवेरी याच्यासोबत काँग्रेस नेत्यांनी कार्यक्रम केले असून त्याच्याशी त्यांचेच संबंध असल्याचा दावा भाजपने केला आहे. मडगावचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, मडगावचे माजी नगराध्यक्ष बबिता प्रभुदेसाई यांच्यासमवेत कपिल झवेरीचे फोटोही भाजपतर्फे सादर करण्यात आले आहेत.
पणजीतील भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपने काँग्रेसकडून केलेल्या आरोपांचा निषेध करत ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा काँग्रेसला दिला आहे. यावेळी भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक म्हणाले की, कपिल झवेरीसारखे अनेक लोक मुख्यमंत्री, मंत्री व इतर भाजप नेत्यांना आगाऊ वेळ ठरवून भेटतात. याचा अर्थ ते त्यांच्या भानगडीत सामील आहेत, असा नव्हे. पण काँग्रेस नेत्यांनी झवेरीसह कार्यक्रमात भाग घेतला. आमदार कामत यांचे पूर्वीचे ओएसडी प्रकाश वेळीप यांनी आपल्या सोशल मीडियावरील एक पोस्टमध्ये झवेरी याला ‘सर’ म्हटले याचा अर्थ काय? अशी विचारणा श्री. नाईक यांनी केली. काँग्रेसकडे कोणताच विषय नाही म्हणून त्यांचे नेते व प्रदेश अध्यक्ष गिरिश चोडणकर हे वाटेल तसे आरोप करीत सुटले आहेत. त्यात काही तथ्य नाही. ते आरोप पूर्णपणे निराधार असून आमदार सांभाळता येत नाही ते आणखी तरी काय करणार ? प्रश्न श्री. नाईक यांनी उपस्थित केला.
सध्या काँग्रेसकडे 5 आमदार शिल्लक आहेत ते सुद्धा त्या पक्षाला डोईजड झाले असून टिकतील की नाही याची शाश्वती नाही. धाडी घातल्याने अमलीपदार्थ जप्त होत आहेत. आमदार कामत मुख्यमंत्री असताना त्यांच्या कारकिर्दीत किती धाडी घातल्या ? किती अमलीपदार्थ जप्त झाले? ते त्यांनी सांगावे, असे श्री. नाईक म्हणाले.









