प्रतिनिधी / कुडाळ:
तालुक्यातील घावनळे येथील रहिवासी, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व वित्त सभापती, कुडाळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ आबा मंगेश मुंज (61) यांचे सोमवारी पहाटे गोवा-बांबोळी रुग्णालयात निधन झाले. घावनळे गावचे सरपंच म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची जिल्हय़ात ओळख होती. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मुंज हे काही महिने आजारी होते. मध्यंतरी ते बरे होऊन घरी आले होते. त्यानंतर पुन्हा तब्येत बिघडल्याने त्यांना गोवा येथे हलविण्यात आले होते. सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. मुंज हे काँग्रेसचे धडाडीचे कार्यकर्ते होते. अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. घावनळे दशक्रोशीवर मुंज यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे वर्चस्व होते. घावनळेचे सरपंच म्हणून त्यांनी यशस्वीपणे कारकिर्द सांभाळली. घावनळे जिल्हा परिषद मतदारसंघातून 1997 मध्ये ते निवडून गेले होते. सलग तीनवेळा ते जिल्हा परिषदेमध्ये निवडून आले होते. त्यांनी 15 वर्षे जि. प. सदस्य पद उपभोगले. याच काळात ते जिल्हा परिषदेच्या बांधकाम व वित्त समितीचे सभापती झाले. घावनळे विकास सोसायटीवरही ते पूर्वी कार्यरत होते.
जिल्हय़ात राजकीयदृष्टय़ा विचार करता, अनेक स्थित्यंतरे झाली. अनेकांनी पक्ष बदलले. मात्र, मुंज हे कायम काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी कधीही काँग्रेस पक्ष सोडला नाही. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. घावनळे गावासह पंचक्रोशीतील रस्ते व अन्य विकासकामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, तीन बहिणी, भावजय, पुतणे व अन्य परिवार आहे. सोमवारी सकाळी घावनळे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे बंधू संतोष मुंज यांनी त्यांना अग्नी दिला. अंत्ययात्रेत आमदार वैभव नाईक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, विलास गावडे, प्रकाश जैतापकर, जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, आत्माराम ओटवणेकर, नीता राणे, बबन कदम, अभय शिरसाट, मंदार शिरसाट, राजन बोभाटे, महेंद्र सांगेलकर तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.









