इंधन दरवाढ, कृषी कायद्यांना विरोध ः सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्त्वाखाली यमकनमर्डीत आंदोलन
वार्ताहर / यमकमनर्डी
इंधन दरवाढ, नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात गुरुवारी काँग्रेस कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी यमकनमर्डी क्रॉसजवळ 20 मिनिटे राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन छेडले. दरम्यान, भाजप सरकारविरोधात घोषणा देत गावातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली. अचानक महामार्ग रोखण्यात आल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.
यावेळी बोलताना चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी, राज्य भाजप आणि केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. देशात खासगीकरणाला अधिक पाठिंबा देत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाला काँग्रेसचा तीव्र विरोध आहे. शेतकऱयांवर अन्याय करीत सर्वसामान्य दररोज उपयोग करीत असलेल्या वस्तूंचे दर वाढवून ठेवले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जगणे मुश्किल बनले आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, उपतहसीलदार एस. जे. साळुंखे यांच्यामार्फत केंद्र आणि राज्य सरकारला निवेदन देण्यात आले.
यावेळी यमकनमर्डी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष विरण्णा बिसिरोट्टी, जि. पं. सदस्य महांतेश मगदुम, ता. पं. अध्यक्ष दस्तगीर बस्सापुरी, रणजीत रजपूत, ता. पं. सदस्य निंगनगौडा पाटील, एम. एस. कुंदी, विनय पाटील, राजू अवटे, महादेव पटोळी, प्रकाश बस्सापुरी, माजी ता. पं. सदस्या शहनाज गडेकाई, राजू माऱयाळी, शिवशंकर झट्टी, जावेद जकाती, ओंकार तुबची, रवि जिंड्राळी, जोमलिंग पटोळी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते, महिला गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.
यावेळी यमकनमर्डी पोलीस स्थानकाचे पीएसआय रमेश पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.