‘झाले गेले विसरा पक्षासाठी एकत्र या’ अशी साद घालत सोनिया गांधी यांनी नववर्षात काँगेसचे नेतृत्व राहुल गांधी करणार असे संकेत तर दिले आहेत, जोडीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून महाआघाडीतील काँग्रेसच्या योगदानाची आठवण करून दिली आहे. सोनिया गांधींचे हे पत्र ‘लेटर बॉम्ब’ मानले जाते आहे. हा बॉम्ब पाठवून त्या थांबलेल्या नाहीत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार भाई जगताप यांची नियुक्ती करून त्यांनी काँग्रेस ऍक्शनमध्ये आली आहे हा संदेशही दिला आहे. ओघानेच कॉंग्रेसला ‘अंडर एस्टीमेट’ करणाऱया आणि भाजपाविरोधी आघाडीचे नेतृत्व करू पाहणाऱया शरद पवार आदी नेत्यांना योग्य तो संदेश पोचवला आहे. महाराष्ट्रात सत्तेच्या उबेला बसलेल्या कॉंग्रेस मंत्र्यांनाही आपले पक्षभान हरवले आहे याची जाणीव या लेटर बॉम्बने झाली असावी. थोडक्यात काँग्रेस पक्ष पुन्हा ऍक्शनमध्ये आला आहे. आगामी वर्ष काँग्रेसने संघटित होण्याचा आणि राहुल गांधींच्या नेतृत्वासाठी लढण्याचा निर्धार केला असे दिसते आहे. काँग्रेसमधील निराशेचा, नाराजीचा आणि मतभेदाचा पक्षातील व विरोधातील अनेकजण लाभ उठवत होते. अनेक महत्त्वाच्या घटना, घडामोडी या संदर्भात काँग्रेसकडून प्रतिक्रिया व्यक्त होत नव्हती. संघटनात्मक निवडी-नियुक्त्या होत नव्हत्या. निवडणूक प्रचारात काँग्रेस ताकदीने उतरली आहे असे दिसत नव्हते. पाठोपाठ पराभवांची मालिका सुरू होती. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस संपली-संपणार असा माहोल निर्माण केला जात होता. भाजपा विरोधी आघाडीचे नेतृत्व आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार अशी स्वप्ने शरद पवार व अनेकांना पडू लागली होती. काहींनी तर लॉबिंग सुरु केले होते. महाराष्ट्रात शरद पवार यांनी पावसात भिजून सभा घेतली, भाजपाला रोखले आणि भाजपा-सेना युती फिसकटली. त्यामुळे ते महाआघाडीचे जादूगार ठरले. पवारांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त 12 डिसेंबरला महाराष्ट्रात व इतरत्र जो माहोल रचला गेला त्यामुळे कॉंग्रेस सावध झाली नसती तरच नवल. काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांमुळे शरद पवारांचे पंतप्रधानपद दोनवेळा हुकले हे प्रफुल्ल पटेल यांचे उद्गार आणि पवारांनी यूपीएचे नेतृत्व करावे, पवार यूपीएचे अध्यक्ष होणार वगैरे सोशल मीडियावरचा प्रचार या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस पुन्हा जागी झाली असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. शरद पवारांची राहुल गांधींच्या संदर्भातली काही वक्तव्ये सूचक होती. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधीनी काँग्रेसमधील नाराज नेत्यांशी संवाद सुरु केला होता. ज्येष्ठ नेत्यांची नाराजी दूर करून त्यांनी राहुल गांधींसाठी पुन्हा अनुकूल वातावरण करण्याची चाल यशस्वी खेळली आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महाराष्ट्रातले सरकार काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभे आहे आणि महाआघाडीच्या किमान समान कार्यक्रमात काँगेसने सुचवलेल्या दलित-आदिवासी विकासाकडे दुर्लक्ष होत आहे याकडे लक्ष वेधले आणि पावसात भिजलेले व तरारलेले पीक कितीही बाळसेदार दिसत असले तरी महाआघाडीची शक्ती काँग्रेसही आहे याची जाणीव करून दिली. महाराष्ट्रात ग्रा.पं.च्या निवडणुका सुरू आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आहे. महाराष्ट्रात काँग्रेस नेत्यांना, मंत्र्यांना सरकारमध्ये दुय्यम वागणूक मिळत असल्याची तक्रार आहे. काँग्रेस मंत्र्यांकडे जी खाती आहेत त्यांना पुरेसा निधी दिला जात नाही अशी तक्रार आहे. सरकारमध्ये संवाद आहे आणि एकदिलाने किमान समान कार्यक्रम राबवत आहेत असे चित्र दिसत नाही. वीज बिलाची माफी, गरीब, दलित-आदिवासी विकासाच्या योजना याकडे दुर्लक्ष आणि काँग्रेसकडे जी खाती आहेत त्यांना डावलणे सुरू होते. त्याची नाराजी सोनिया गांधींच्या पत्रातून व्यक्त झाली आहे. सोनिया गांधींनी भाई जगताप यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद व चरणसिंह सप्रा यांना कार्यकारी अध्यक्ष करून मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस पुन्हा ऍक्शनमध्ये आल्याची जाणीव करून दिली आहे. सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱया 23 जणांशी संवाद साधत त्यांनी झाले गेले विसरा व काँग्रेससाठी एकत्र या असे भावनिक आवाहन करत अंतर्गत वादावर तोडगा काढला आहे. पृथ्वीराज चव्हाण वगैरे नेत्यांना त्यांनी चिंतन शिबीर, पक्षाची वैचारिक बांधीलकी यासाठी कार्यकर्त्यांच्या प्रबोधनाच्या सूचना केल्या आहेत. श्रीमती गांधी यांच्या घरी झालेल्या या बैठकीला नाराज 23 पैकी 19 जण उपस्थित होते. मात्र कपिल सिब्बल यांनी पाठ फिरवली होती. सिब्बल यांची भूमिका बघावी लागेल. पण सोनिया गांधी, मनमोहनसिंग यांचेपासून अशोक गेहलोतपर्यंत बहुतेक ज्येष्ठ व प्रमुख नेते यांची मूठ बांधली आहे व राहुल गांधी यांच्या गळ्यात काँग्रेस अध्यक्षपदाची माळ पुन्हा घालण्याचे नियोजन करण्यात त्यांना यश येताना दिसते आहे. राहुल गांधीही पद स्वीकारण्यास राजी झाले आहेत. तोंडावर असलेल्या बंगाल आणि पंजाबच्या निवडणुका आणि मुंबई महापालिका निवडणूक यासाठी काँग्रेसला तयारी करणे गरजेचे होते व काँग्रेसने ती तयारी सुरू केली आहे. काँग्रेस पुन्हा ऍक्शनमध्ये आली आहे. महाराष्ट्रात महाआघाडीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. ही वर्षपूर्ती कोरोनामुळे साधेपणाने साजरी झाली. पण त्याचे श्रेय हव्या त्या प्रमाणात काँग्रेसला काँगेस नेतृत्वाला दिले गेले नाही. महाराष्ट्रातील या महाआघाडीचे शिल्पकार आणि सर्वेसर्वा शरद पवार आहेत, असे चित्र उभे राहिले आहे. त्यालाही धक्का देण्याची योजना काँग्रेसकडून आखली गेली असावी. सोनियांच्या ठाकरेंना लिहिलेल्या पत्रामागे तो उद्देश असावा. काँग्रेस ऍक्शनमध्ये आल्याने काहींच्या अपेक्षांवर पाणी पडणार असले तरी काँग्रेसला दुर्लक्षित करून कुणाला काही करता येणार नाही आणि राहुल गांधीच काँगेसचे नेते हा संदेश देण्यात सोनिया यशस्वी झाल्या आहेत.
Previous Articleएक आलो हुडकायला
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








