तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी
काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलच्या बार्शी तालुका अध्यक्षपदी बार्शी येथील सामाजिक कार्यकर्ते व ख्रिश्चन समाजाचे अध्यक्ष राकेश नवगिरे यांची निवड झाली आहे. त्यांना निवडीचे पत्र बार्शी येथील कार्यक्रमात सोलापूर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष वसीम पठाण यांनी आज दिले.
राकेश नवगिरे हे अल्पसंख्याक समाजासाठी विविध माध्यमातून कार्य करत आहेत. त्यांनी आजपर्यंत बार्शीतील ख्रिश्चन समाजाची स्मशानभूमी, ख्रिश्चन समाजाचे विविध प्रश्न तसेच इतर अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांसाठी कार्य केले आहे तरी वेळ प्रसंगी आंदोलन ही पार पाडले आहे. नवगिरे यांनी रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी शिबीर, पोलिसांसाठी विविध शिबिरे, तसेच कोरोणा च्या काळामध्ये मोफत अन्न वाटप व इतर साहित्य वाटप असे लोकोपयोगी सामाजिक कार्यक्रम आपल्या आर. एन. सामाजिक संघटने मार्फत पार पडले आहेत.
जिल्हाध्यक्ष वसीम पठान यांनी दिलेल्या पत्रात राकेश नवगिरे यांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व काँग्रेस पक्षाच्या विचारधारेप्रमाणे कार्य करावे असे सूचित केले आहे तर येणाऱ्या भावी काळात काँग्रेस पक्षाला जनमानसात परत एकदा स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असेही सांगितले आहे. राकेश नवगिरे यांच्या निवडीबाबत सर्वत्र कौतुक होत असून बार्शी तालुक्याला अल्पसंख्यांक सेलला एक तरुण चेहरा मिळाला अशी चर्चा रंगत आहे.









