10 वर्षांमध्ये 3 मालमत्तांचे भाडेच भरले नाही : सोनिया गांधींकडूनही बंगल्याचे भाडे अदा नाही
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेस पक्षावर सुमारे 19 कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी काँग्रेसला वितरित करण्यात आलेल्या 3 मालमत्तांच्या भाडेरक्कमाची आहे. सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाने 26 अकबर रोड (सेवादल) बंगल्याचे डिसेंबर 2012 पासून, 10 जनपथचे सप्टेंबर 2020 पासून अणि सी-2/109 चाणक्यपुरीचे आगॅस्ट 2013 पासून भाडे भरलेले नाही. गुजरातच्या मिठापूरचे सुजीत पटेल यांनी ही माहिती आरटीआयद्वारे मिळविली आहे.
चाणक्यपुरीचा बंगला ऑल इंडिया काँग्रेस कमिटीला 23 फेब्रुवारी 1985 रोजी वितरित करण्यात आला होता. हा बंगला काँग्रेसला पक्ष कार्यालय म्हणून वापरायचा होता. रायसीना रोडचा बंगला युथ काँग्रेसकडे आहे, तर 26 अकबर रोड आणि चाणक्यपुरीचा बंगला पक्षाच्या कामकाजासाठी वापरला जातो. 26 अकबर रोडच्या बंगल्याचे भाडे 12 लाख 69 हजार 902 रुपये प्रतिमहिना, चाणक्यपुरीच्या बंगल्याचे भाडे 5,07,911 रुपये आणि 10 जनपथचे 4,610 रुपये प्रतिमहिना या दराने भाडे अद्याप भरलेले नाही.
9 वर्षांपूर्वी वाटप रद्द
एका जुन्या आरटीआयनुसार शहर विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱया संपदा संचालनालयाने या मालमत्तांचे वाटप 26 जून 2013 रोजी रद्द केले होते. काँग्रेसला दिल्लीत कार्यालय इमारत निर्माण करण्यासाठी 2010 मध्ये भूखंड देण्यात आला होता. भूखंड वाटपाच्या तीन वर्षांमध्ये काँग्रेसला इमारत उभी करावी लागणार होती आणि 4 बंगले 2013 मध्ये रिकामी करावे लागणार होते. काँग्रेस कमिटीने या बंगल्यांमध्ये राहण्यासाठी 3 वर्षांचा अतिरिक्त कालावधी देण्याची विनंती केली होती. 2017 मध्ये पुन्हा काँग्रेसला नोटीस बजावण्यात आली. बंगले रिकामी करण्यासाठी मोदी सरकारने अनेक नोटीस बजावल्या आहेत. अद्याप हे बंगले काँग्रेसकडेच आहेत. त्यांचे भाडे बाजारदरापेक्षा अत्यंत कमी असूनही काँग्रेसने ते भरलेले नाही.
पंतप्रधान निवासस्थानापेक्षा मोठे 10 जनपथ
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना वितरित करण्यात आलेला 10 जनपथ बंगला देशाच्या अन्य नेत्यांच्या तुलनेत सर्वात मोठा आहे. पंतप्रधानांचे निवासस्थान 7 रेसकोर्सपेक्षाही तो मोठा आहे. सेंट्रल पब्लिक डिपार्टमेंटनुसार पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे क्षेत्रफळ 14,101 चौरस मीटर आहे. तर सोनिया गांधींच्या बंगल्याचे क्षेत्रफळ 15,181 चौरस मीटर इतके आहे.
काँग्रेसवरील एकूण थकबाकी
गुणवंत रुपारेलिया नावाच्या व्यक्तीने या पूर्ण भाडय़ाची बेरीज केली आहे. यानुसार 26 अकबर रोडचे 110 महिन्यांचे भाडे 12,69,902 रुपये प्रतिमहिना या हिशेबानुसार सुमारे 13 कोटी 96 लाख 89 हजार 220 रुपये काँग्रेसला भरायचे आहेत. 10 जनपथचे 17 महिन्यांचे भाडे 4,610 रुपये प्रतिमहिन्याच्या हिशेबानुसार 78,370 रुपये तर चाणक्यपुरीच्या बंगल्याचे 102 महिन्यांचे भाडे 5 लाख 7 हजार 911 रुपये प्रतिमहिन्याच्या हिशेबाने एकूण 5 कोटी 18 लाख 06 हजार 922 रुपये भरावे लागणार आहेत. म्हणजेच एकूण थकबाकी 19 कोटी रुपयांहून अधिक आहे.









