राज्याचे नवे प्रभारी दिनेश गुंडू राव यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यात काँग्रेसमध्ये लवकरच अनेक संघटनात्मक बदल करण्यात येणार असल्याचे संकेत गोव्याचे नवनियुक्त प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी दिले आहेत. त्याचाच भाग म्हणून येत्या डिसेंबरपर्यंत प्रदेश काँग्रेस समितीसह जिल्हा, महिला, युवा, आदी समित्यांची फेररचना होणार आहे. तसेच बुथ अध्यक्षांना प्रशिक्षण, पक्ष पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणणे, यासारखे अनेक कार्यक्रम राबविले जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
प्रभारीपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच गोवा भेटीवर आल्यानंतर पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, उपाध्यक्ष एम. के. शेख, जिल्हा अध्यक्ष ज्यो डायस, विजय भिके, सरचिटणीस अमरनाथ पणजीकर आदी मान्यवर त्यावेळी उपस्थित होते.
गोव्यात आल्यानंतर आपण सर्वप्रथम विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, वरिष्ठ नेते प्रतापसिंह राणे, लुईझिन फालेरो, रवी नाईक, फ्रान्सिस सार्दिन, आलेक्स लॉरेन्स, यांच्यासह अनेक आजी माजी आमदार, प्रदेश अध्यक्षांसह अन्य पदाधिकारी, अन्य नेते, सर्व जिल्हा अध्यक्ष, गट अध्यक्ष, युवा अध्यक्ष यांच्या भेटी घेऊन चर्चा केली, असे ते म्हणाले.
गत निवडणुकीत आम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. आम्हीच सरकार स्थापन करणार होतो. परंतु शेवटच्या क्षणी कोणत्या खेळी खेळल्या गेल्या ते सर्व गोमंतकीयांना माहीत आहेत. राज्यातील विद्यमान सरकार हे अत्यंत भ्रष्ट सरकार असून केवळ सत्तेसाठी हपापलेले आहे. लूट करणे आणि इतरांचे आमदार फोडून सत्ता टिकविणे हेच या सरकारचे, मुख्यमंत्री, त्यांचे मंत्री या सर्वांचे धोरण बनले आहे, असे ते म्हणाले.
भाजपात आज कुणीच विकासाबद्दल बोलत नाहीत. कारण विद्यमान सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. कोरोना, म्हादई, यासारखे अनेक महत्त्वपूर्ण विषय हाताळणे या सरकारला जमले नाही. प्रशासनावर तर त्यांचे नियंत्रणच राहिले नाही. गोव्यासारखीच स्थिती कर्नाटकातही असून तेथील भाजप सरकारही प्रचंड भ्रष्टाचारी असल्याचा दावा त्यांनी केला.
देशांत सध्या हुकूमशाही चाललीय
भाजपचे केंद्रातील सरकार तर लोकशाहीसुद्धा मानत नाही. धर्म आणि तत्वांच्या गोष्टी ते करतात परंतु ते स्वतःच ती तत्वे मानत नाहीत. त्यांनी देश विकावयास काढला आहे. त्यामुळेच बहुमूल्य अशा नवरत्न कंपन्यांसह रेल्वेचेसुद्धा त्यांनी खासगीकरण केले आहे. त्यामुळे हा देश धनाडय़ांच्या हातात गेला असून तेच तो चालवित आहेत. हे सरकार म्हणजेच एक प्राईव्हेट लिमिटेड कंपनी बनली आहे. भरीस हे सरकार न्यायव्यवस्था, सीबीआय, ईडी, आयकर खाते यांपैकी कुणालाच जुमानत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रसारमाध्यमांनाही ते जुमानत नाहीत. देशात सध्या हुकूमशाही चालली आहे, त्यातून विरोधकांची सतावणूक, गळचेपी करण्याचे षडयंत्र चालविले आहे, असे आरोप गुंडुराव यांनी केले.
बुथ अध्यक्षांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम
गोव्यात पुढील दीड वर्षांत विधानसभा निवडणूक होणार असून त्यादृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण कार्यक्रम राबविले जाणार आहेत. त्यात प्रामुख्याने बुथ समित्या बळकट करण्यात येणार असून 30 नोव्हेंबरपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर डिसेंबर महिन्यात बुथ अध्यक्षांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्याद्वारे त्या प्रभावीपणे कार्यरत होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आझाद मैदानावर 5 नोव्हेंबर रोजी निषेध कार्यक्रम
31 ऑक्टोबर रोजी मडगाव आणि म्हापसा येथे ‘किसान अधिकार’ दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. हाथ्रस, उनाव, खतुवा आदी ठिकाणी झालेल्या महिला व दलितांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ दि. 5 नोव्हेंबर रोजी आझाद मैदानावर निषेध कार्यक्रम होणार आहे. केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या कृषी विधेयकांचा विरोध व निषेध करण्यासाठी देशपातळीवर आरंभलेल्या कार्यक्रमाचा भाग म्हणून 8 नोव्हेंबर रोजी डिचोलीपासून मांद्रे दरम्यान ट्रक्टर रॅली काढण्यात येणार आहे.
काँग्रेस प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी स्वागतपर भाषणात श्री. गुंडू राव यांची ओळख करून दिली.
म्हादईप्रश्नी पर्रीकरांनी गोमंतकीयांना मूर्ख बनविले
म्हादईच्या विषयावर माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोमंतकीयांना मूर्ख बनविले, त्यांनी खरे म्हणजे कर्नाटक मुख्यमंत्र्यांना पत्र लिहायला हवे होते. परंतु त्यांनी विरोधी पक्षनेते येडीयुरप्पा यांना पत्र लिहिले. मी येथे गोमंतकीयांना मूर्ख बनविण्यासाठी आलेलो नाही. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असल्यामुळे त्यावर जादा भाष्य करणे योग्य होणार नाही, असे सांगून या प्रश्नी आता पंतप्रधानांनी लक्ष घालावे, अशी मागणी गुंडू राव यांनी केली. कोळसा वाहतुकीसाठी रेल्वे मार्गांचे रुंदीकरण हे अदानींच्या फायद्यासाठीच असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातचे कळसुत्री बाहुले आहे. ते स्वतः कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. भाजपने आरटीआय कायद्याचा खून केला. लोकपालला संपविले, असे आरोप त्यांनी केले.









