अध्यक्षपदी पुन्हा राहुल गांधी? : सोनियांची ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आमंत्रित केलेल्या बैठकीत या मुद्दय़ावर चर्चा झाल्याचे समजते. राहुल गांधी यांच्याकडेच पक्षाचे अध्यक्षपद सोपविण्यावर बहुतांश नेत्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. दरम्यान, पक्षात कोणतेही मतभेद नसून भविष्यात पक्षबांधणीला बळकटी देण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्यासंबंधी चर्चा झाल्याची स्पष्टोक्ती पक्षाचे नेते पवनकुमार बन्सल यांनी दिली आहे.
दिल्लीत शनिवारी झालेल्या बैठकीत नाराज नेत्यांचे शंकानिरसन करण्याचा प्रयत्न हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला. पक्षबांधणीसाठी नव्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता काही नेत्यांनी बैठकीमध्ये व्यक्त केली. त्यानंतर सोनिया गांधी यांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर सर्व नेत्यांनी समाधान व्यक्त केले. नजिकच्या काळात अन्य नेत्यांसमवेतही अशाप्रकारच्या चर्चा घडवून पक्षाची कामगिरी सुधारण्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याचे बन्सल यांनी स्पष्ट केले. वादाच्या मुद्दय़ांबरोबरच राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याची मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी लावून धरल्याने त्यावरच या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. राहुल यांच्याकडेच पक्षाची सूत्रे देण्यावर जवळपास एकमत झाल्याचेही सूत्रांनी सांगितले.
काँग्रेसचे ज्ये÷ नेते रणदीप सुरजेवाला यांनी या सर्व मुद्यावर भाष्य केले आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया आम्ही लवकरच सुरू करणार आहोत. माझ्यासहित पक्षातील 99.9 टक्के लोकांना राहुल गांधी हे अध्यक्ष व्हावेत असे वाटते. परंतु शेवटी राहुल आणि सोनिया गांधी यांच्याकडूनच निर्णयावर शिक्कामोर्तब होणार असल्याची स्पष्टोक्ती सुरजेवाला यांनी दिली आहे.
बिहार निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षात संघटनात्मक बदल व्हावे यासाठी काँग्रेसच्या 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांच्याकडे लेखी स्वरुपात भूमिका मांडली होती. पक्षातील त्या आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांशी सविस्तर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधी यांनी शनिवारी 10 जनपथ येथील निवासस्थानी बैठक बोलावली होती. ही बैठक आयोजित करण्यासाठी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पुढाकार घेतला होता.
काँग्रेसने पक्षातील फाईव्ह-स्टार संस्कृती सोडली पाहिजे आणि पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी नव्याने मोर्चेबांधणी केली पाहिजे, असा सूर काही नेत्यांनी पत्राद्वारे आळवला होता. सदर नेत्यांवर काँग्रेसच्या नि÷ावंतांनी टीका केली होती. पण सोनिया गांधी यांनी नाराज नेत्यांसोबत चर्चा करून पक्षातील कोंडीवर मार्ग काढण्याची तयारी दर्शवल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
काँग्रेस पक्षाला बळकट करणे आणि नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडणे या काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या बैठकीत डॉ. मनमोहन सिंह, ए. के. ऍन्टोनी, पी चिदंबरम, गुलाम नबी आझाद, पृथ्वीराज चव्हाण, आनंद शर्मा, शशी थरूर, भूपिंदर सिंह हुडा, केसी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, हरिष रावत ही नेतेमंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. तसेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधीदेखील या बैठकीला उपस्थित होत्या.









