ओवेसींचा राहुल गांधींच्या हिंदूंबद्दलच्या टिप्पणीवर आक्षेप
दिल्ली / प्रतिनिधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत हा हिंदूंचा देश असल्याचे वक्तव्य केल्याने आणि हिंदू आणि हिंदुत्व यांच्यातील फरकाची व्याख्या यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “राहुल आणि काँग्रेसने हिंदुत्वासाठी जमीन सुपीक केली. आता ते बहुसंख्यवादाचे पीक घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 2021 मध्ये ‘हिंदूंना सत्तेवर आणणे’ हा ‘सेक्युलर’ अजेंडा आहे. वाह! तर भारत सर्व भारतीयांचा असून एकट्या हिंदूंचा नाही. भारत सर्व धर्माच्या लोकांचा आहे तसेच ज्यांची श्रद्धा नाही अशा लोकांचाही आहे.”
हिंदू आणि हिंदुत्ववादी यातील फरक विशद करताना रविवारी जयपूरच्या सभेत राहुल गांधी म्हणाले, “दोन शब्दांचा अर्थ एकच असू शकत नाही. प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा असतो. आज आपल्या देशाच्या राजकारणात हिंदू आणि हिंदुत्वाचा अर्थ एकच आहे. मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नाही. महात्मा गांधी हिंदू होते आणि नथुराम गोडसे हे हिंदुत्ववादी होते, असेही ते म्हणाले.
“काहीही झाले तरी, हिंदू आपले संपूर्ण आयुष्य सत्याच्या शोधात घालवतो, तर हिंदुत्व आपले संपूर्ण आयुष्य सत्तेच्या शोधात आणि सशक्त होण्यात घालवून सत्तेसाठी तो कोणाचीही हत्या करेल. हिंदूचा मार्ग म्हणजे ‘सत्याग्रह’ आहे तर हिंदुत्वाचा मार्ग ‘सत्ताग्रह’ आहे.