प्रतिनिधी / मडगाव
नावेली मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार बाबुश कुयेलो यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला होता. त्यामुळे या मतदार संघातील जिल्हा पंचायतीची निवडणूक नंतर होणार आहे. बाबुश कुयेलो हे एक काँग्रेसचे प्रामाणीक कार्यकर्ता होते. त्यांचा लोकसंपर्कही चांगला असून प्रत्येकाच्या मदतीसाठी ते सदैव पोहचायचे त्यामुळे काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाने या मदतारसंघाची निवडणूकीची तारीख घोषीत केल्यानंतर त्यांचे पुत्र अल्ड्रिच कुयेलो यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी नावेली काँग्रेसचे कार्यकर्ता बोर्गेस रिबेलो यांनी केली.
मडगाव येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोर्गेस बोलत होते. यावेळी पत्रकार परिषदेत अल्ड्रिच कुयेलो, नेटी कुयेलो व इतर उपस्थित होते.
22 मार्च होऊ घातलेल्या जि.पं.निवडणूकीच्या प्रचारावेळी बाबुश कुयेलो यांच्या सोबत त्यांचा मुलगा अल्ड्रिच कुयेलो होता. तेव्हा त्यांची ओळख नावेली मतदार संघातील लोकांसोबत झालेली असून त्यामूळे काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी अल्ड्रिच कुयेलो यांनाच उमेदवारी देण्यात येण्याची मागणी होत असल्याचे रिबेलो म्हणाले.
अल्ड्रिच कुयेलो म्हणाले की, वडीलाप्रमाणेच मला लोकांच्या हितासाठी कार्य करायचे आहे. तेव्हा काँग्रेसने उमेदवारी दिल्यास मला वडीलाप्रमाणेच समाजसेवा करण्याची संधी लाभेल. जर काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यास कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन पुढचा निर्णय घेण्यात येईल. माझ्या परिवाराने अनेक वर्षापासून काँग्रेससाठी प्रामाणीकपणाने काम केलेले आहे.









