मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे लोकांना आवाहन : भाजपाने विकासकामांत खंड पडू दिला नाही, गिरदोली येथे भुयारी मार्गाचे उद्घाटन
प्रतिनिधी / कुंकळ्ळी
काँग्रेसने आश्वासने देण्याच्या पलीकडे काहीच का केलेले नाही हे दिगंबर कामत, युरी आलेमाव यांना विचारा. याउलट भाजपने विकासकामांत खंड पडू दिलेला नाही. काँग्रेसला विकासकामांची पायाभरणी करून लोकांना खूश करण्याची व आम्ही काही तरी करत आहोत हे दाखविण्याची सवयच झाली होती. जुवारी पुलाची तीन वेळा व आपल्या साखळी येथे तर दोन वेळा पायाभरणी करण्यात आली. काँग्रेसच्या काळात कामे पूर्ण न होता राहून जायची, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
गिरदोली येथे रेल्वेमार्गाच्या खालून जाणाऱया भुयारी मार्गाच्या उद्घाटनप्रसंगी सावंत बोलत होते. आम्ही गोवा मुक्तीची 60 वर्षे साजरी करत आहोत. गिरदोलीतील लोक मागील 40 ते 50 वर्षे सतत या भुयारी मार्गाची मागणी करत होते. शेवटी आमदार क्लाफासियो डायस यांनी मनावर घेतले. त्यांना वीजमंत्री नीलेश काब्राल यांचे सहकार्य लाभले व आज भुयारी मार्गाचे लोकार्पण करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. कुंकळ्ळी मतदारसंघात आमदार डायस यांची 90 टक्के कामे पूर्ण झाली असून राहिलेली 10 टक्के तीन महिन्यांत पूर्ण होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भाजपाने दिलेली आश्वासने पूर्ण केली
कुंकळ्ळी मतदारसंघाच्या विकासासाठी आपण काँग्रेस सोडून भाजपात आलो, असे आमदार डायस सदैव सांगत असतात. ते खरे आहे. भाजपने आजपर्यंत लोकांना जी आश्वासने दिली ती पूर्ण केली आहेत. पायाभरणी केली ती कामे पूर्ण करण्यास प्राधान्य दिले. लोकांना हवी ती कामे यापुढेही डायस करतील. आता राहिला विषय नोकऱयांचा. याबाबतीत सरकारने पूर्ण खबरदारी घेतली असून 6 हजार नोकऱयांची जाहिरात दिली आहे. अजून 4 हजार नोकऱयांची जाहिरात देणे बाकी आहे. तिही लवकरच देण्यात येणार आहे. नोकरभरती योग्य निकषांनुसार केली जाईल, अन्याय होऊ देणार नाही, असे सावंत यांनी सांगितले.
शिवाय मॉडेल करिअर सेंटर सीआयआर सुरू केले आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सरकार तुमच्या दारात हा नवा उपक्रम सुरू केलेला आहे. सरकार त्याद्वारे अंत्योदय तत्त्वावर शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणार आहे. स्वयंपूर्ण मित्र म्हणून नियुक्त केलेले सरकारी अधिकारी शनिवार, रविवार लोकांसाठी राबत आहेत. अजून सरकारला मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी जनतेने जशी आतापर्यंत सरकारला साथ दिली तशीच ते यापुढेही देतील, अशी अपेक्षा सावंत यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चांदर पंचायतीत रेल्वे उड्डाणपूल ते चांदरपर्यंत जोडरस्ता, पारोडा पंचायतीत कामरभाट साकव आणि चांदर येथे एमडीआर 40 रस्त्याचे रूंदीकरण या कामांची पायाभरणी झाली. ही सर्व कामे 6 महिन्यांत पूर्ण होणार, असे सावंत म्हणाले.
लोकांचे ताटकळत राहणे बंद होईल : काब्राल
मडगाव, पणजीला जाण्याचा गिरदोलीचा हा मुख्य रस्ता असून रेल्वे जाईपर्यंत अर्धा-अर्धा तास लोकांना ताटकळत राहणे भाग पडत होते. बगलरस्ता करण्याबाबत लोकांचे दुमत होते. आपण लोकांना आपल्या एका कार्यक्रमात भुयारी मार्ग सोयीस्कर ठरेल याची खात्री दिली. सरपंच, पंच यांनीही सहकार्य दिले. लोकांना आता वेळ वाया न घालवता मडगाव गाठता येईल ही आनंदाची गोष्ट होय. यापूर्वी येथे मंत्री, आमदार व अन्य अनेक लोकप्रतिनिधी भेट देऊन आश्वासन देऊन गेले. शेवटी ही मागणी आमदार डायस व मुख्यमंत्री सावंत यांनी पूर्ण केली, याकडे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी लक्ष वेधले.
कोविडच्या संकटात सरकारची आर्थिक स्थिती नाजूक असूनही मुख्यमंत्री सावंत यांनी लक्ष घातले आणि विकासकामे पुढे नेत योग्य शासन दिले याची जाणीव काब्राल यांनी लोकांना करून दिली. मुख्यमंत्री कुंकळ्ळी मतदारसंघाचा योग्य प्रकारे विकास करण्यासाठी व येथील लोकांसाठी उत्तम सहकार्य देत आले आहेत. यापुढेही आमदार डायस यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी रेल्वे अभियंता रवी पाठक, जिल्हा पंचायत सदस्या संजना वेळीप, सरपंच जेनेटिक कुलासो, फा. जेम्स ओरिता, उपसरपंच ब्रायन, इतर पंच, अन्य पंचायतींचे सरपंच व पंच आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
भाजप प्रवेश लाभदायक ठरला : डायस
मुख्यमंत्री सावंत तसेच वीजमंत्री काब्राल यांची बरीच मदत याकामी मिळाली. भुयारी मार्गामुळे माकाझन, गिरदोली, चांदर पंचायतांतील त्याचप्रमाणे कुडचडे, केपे व कुडतरी मतदारसंघातील लोकांना मडगावला जाणे अधिक सोयीस्कर झाले आहे. मागील निवडणुकीत भुयारी मार्ग व अन्य कामांचे आश्वासन आपण दिले होते. ती कामे अडविण्याचे कारस्थान झाले, तरीही ती पूर्ण करण्यात आपणास भाजपची साथ मिळाली. आपला भाजपात प्रवेश लाभदायक ठरला. अनेक विकासकामे पूर्ण झाली. लोकांच्या समस्या सोडवता आल्या. अनेक योजनांचा लाभ लोकांना मिळवून देता आला, असे आमदार डायस यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा पंचायत निवडणुकीत संजना वेळीप यांना मतदारांनी निवडून दिले. हा एक प्रकारे सरकार व आपल्यावर मतदारांनी दाखवलेला पूर्ण विश्वास म्हणता येईल. मतदारांचे उपकार विसरणे आपल्याला शक्मयच नाही, असे ते म्हणाले. कोविड महामारीमुळे विकासकामांना खीळ बसली, कठीण प्रसंग आला. तरी मुख्यमंत्री सावंत यांनी मोठय़ा धैर्याने लोकाभिमुख प्रशासन दिले, असे डायस यांनी सांगितले. मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वाखाली आगामी सरकार हे भाजपचेच असेल. मतदारांनी पुन्हा एकदा भाजपला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. आपण लोकांना सोयीस्कर ठरावे व त्यांचा वेळ वाचावा यासाठी चांदर, गिरदोली, कुंकळ्ळी येथे कार्यालये उघडली, याकडे डायस यांनी लक्ष वेधले.
निवडणुकीत डायस यांच्याबरोबर झटलेल्या कार्यकर्त्यांपैकी जे आज हयात नाहीत त्यांना यावेळी दोन मिनिटे शांतता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल्टन फर्नांडिस व निकिला जॉर्जिना गामा यांनी केले व त्यांनीच आभार मानले. कैक वर्षांची भुयारी मार्गाची मागणी एकदाची पूर्ण झाल्याबद्दल यावेळी उपस्थित नागरिकांनी आनंद व्यक्त केला व मुख्यमंत्री सावंत, वीजमंत्री काब्राल, आमदार डायस यांना धन्यवाद दिले.









