महिला-दलितांवरील अत्याचाराविरोधात धरणे
प्रतिनिधी/ पणजी
गोवा प्रदेश काँग्रेस समितीतर्फे राजधानी पणजीत आझाद मैदानावर महिला दलित उत्पीडन विरोधी दिवस पाळण्यात येऊन त्यांच्यावरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात धरणे धरुन निदर्शने करण्यात आली. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो तसेच काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱयांची उपस्थिती होती.
अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या आदेशानुसार संपूर्ण देशभरात राज्यांनी हे आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून गोव्यात हे आंदोलन प्रदेश काँग्रेस समितीतर्फे झाले. देशात महिला – दलितांवर अन्याय अत्याचार वाढत असून त्यांचा आवाजही दडपला जात आहे. तो थांबवा, त्यांना न्याय द्या, अत्याचार करु नका अशी मागणी करणारे फलक काँग्रेस निदर्शकांच्या हाती होती. ‘नारी शक्ती झिंदाबाद, अत्याचार बंद करा, महिलांचा आदर करा’ अशी विविध घोषणाबाजी काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी केली. सायंकाळी 4 ते 6 असे साधारण दोन तास काँग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात आले. त्यास बरा प्रतिसाद मिळाला. देशभरातील महिला-दलितांवरील वाढणारे अन्याय चिंताजनक असून ते रोखावेत अशी मागणी त्यावेळी झाली. श्री. कामत, चोडणकर तसेच इतरांची त्यावेळी भाषणे झाली. वाढत्या अन्यायप्रकरणी त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.









