काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे केले आवाहन
प्रतिनिधी / पणजी
भाजपला चढलेला सत्तेचा माज उतरविण्यासाठी अधिकाधिक लोकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा, असे आवाहन प्रोग्रेसिव्ह फ्रंट संघटनेचे नेते तथा आरएसएसचे खंदे स्वयंसेवक महेश म्हांबरे यांनी केले आहे.
ऍड. हृदयनाथ शिरोडकर यांच्यासह काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, आमदार आलेक्स लॉरेन्स, वरद म्हार्दोळकर, संगीता परब, अर्जून परब, मेघःश्याम राऊत, विजय भिके, ज्यो डायस, आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपला सत्तेचा माज चढला आहे. 2005 मध्ये भाजप सोडल्यापासून आम्ही कायम या पक्षाकडे टक्कर देत आहोत. आता निवडणूक जवळ आली असून या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस हाच पर्याय आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, असे म्हांबरे म्हणाले.
एकेकाळी भाजप पॅसिनोंना विरोध करत होता. आज त्यांचे केंद्रीय नेते सुद्धा गोव्यात येऊन गोवा पॅसिनोंची राजधानी बनविणार असल्याच्या घोषणा करत आहे. यावरून भाजप गोमंतकीयांना गृहित धरत असल्याचे सिद्ध होत असून त्यांचा हा माज उतरविण्याची गरज आहे, असे म्हांबरे यांनी सांगितले.
गेल्या दहा वर्षात भाजपने एवढय़ा भानगडी करून ठेवल्या आहेत, त्या निस्तरण्यासाठी पुढील दहा वर्षे लागणार आहेत. त्यांनी गोव्याची जीवनदायिनी म्हादई कर्नाटकाला विकली, गोव्याला कोळसा हब बनविण्याचे प्रयत्न केले, मोले अभयारण्यात तीन प्रकल्प आणून पर्यावरण नष्ट करण्याचा घाट घातला, वास्कोतील बायण समुद्रकिनारा एमपीटीच्या घशात घातला, नद्यांचेही खाजगीकरण करण्याचे प्रयत्न करण्यात आले, असे ऍड. शिरोडकर यांनी सांगितले.
अशाप्रकारे गोव्याचे अस्तित्वच संपविण्यास उठलेल्या या पक्षाला आता 22 मध्ये 22 जागा जिंकण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. परंतु जनतेने 22 मध्ये त्यांना घरची वाट दाखवावी, असे आवाहन शिरोडकर यांनी केले.
आलेक्स लॉरेन्स, गिरीश चोडणकर, यांनीही विचार मांडले. भाजपचा पाडाव करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे लढा देणे ही सध्यस्थितीत काळाची गरज आहे. ते काम काँग्रेस पक्षच करू शकतो, असे मत त्यांनी मांडले. स्वतःकडे लाखो सदस्य असल्याचा दावा करणाऱया भाजपकडे प्रत्यक्षात कार्यकर्तेच नाहीत. नेते तर नाहीच नाही. त्यामुळे अन्य पक्षातील नेते कार्यकर्त्यांना विकत घ्यावे लागतात, अशी टीकाही यावेळी करण्यात आली.









