मुंबई \ ऑनलाईन टीम
भाजप नेते नितीन गडकरी हे पंतप्रधानपदासाठी योग्य व्यक्ती असल्याचे मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. सोशल मीडिया असेल किंवा राजकीय वर्तुळात भाजप नेते नितीन गडकरी यांच्या कामाचे नेहमीच कौतुक होत आले आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील नितीन गडकरी यांच्या या काम करण्याच्या पद्धतीचे तोंड भरून कौतुक केले आहे.
अशोक चव्हाण म्हणाले की, नितीन गडकरी हे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा आणि मूलभूत सुविधांबाबत गांभीर्याने विचार करतात. मी लेखाच्या माध्यमातून तसेच ट्विटरवरून त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. मात्र याचा अर्थ मी त्यांच्या राजकीय भूमिकेचे समर्थन करतो, असा होत नाही. नितीन गडकरी हे चुकीच्या पक्षात असलेले योग्य व्यक्ती असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नितीन गडकरी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणून केलेल्या कामाचे नेहमीच कौतुक झाले आहे. अशोक चव्हाण यांनी देखील नितीन गडकरींचे केलेले कौतुक सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे.








