कॅसिनोंवर आंतरराष्ट्रीय पोकर स्पर्धा आयोजनामुळे संतप्त : तिसऱया लाटेची व्यक्त केली भीती.भाजप सरकारचा निषेध,महागाईविरोधातही उठवला आवाज
प्रतिनिधी /पणजी
मांडवीतील कॅसिनोंमध्ये बेकायदेशीरपणे आंतरराष्ट्रीय पातळीवरील पोकर स्पर्धा आयोजित करून कोरोनाच्या तिसऱया लाटेला कॅसिनोचालक आमंत्रण देत असल्याच्या निषेधार्थ प्रदेश युवक काँग्रेसतर्फे राजधानी पणजीत मशाल मोर्चा काढण्यात आला. मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरलेल्या मोर्चेकऱयांना पोलिसांनी प्रथम धक्काबुक्की केली व नंतर पांगविण्यासाठी यथेच्छ लाठीहल्ला केला. त्यात अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. या पळापळीत खाली पडलेली एक महिला तुडवली गेल्यामुळे गंभीर जखमी झाली असून तिला खोर्ली येथील खासगी इस्पितळातही दाखल करण्यात आले आहे.
प्रक्षुब्ध झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारचा तसेच पोलिसांचा देखील तीव्र शब्दात जोरदार घोषणाबाजीने निषेध केला. या आंदोलकांवर लाठीहल्ला करण्याचा आदेश पोलिसांना देण्यात आला होता का? असे तेथे उपस्थित उपजिल्हाधिकाऱयास विचारले असता, ‘आपण कोणताही आदेश दिला नव्हता’, असे त्याने सांगितले. त्यावरून पोलिसांनी स्वतःच्याच मर्जीने हा लाठीहल्ला केला असल्याचे सिद्ध झाले, अशी प्रतिक्रिया युवा अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी व्यक्त केली आहे.
प्रसंगी कॅसिनोवर धडक देऊ : संकल्प आमोणकर
राज्यात कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये आतापर्यंत सुमारे 3350 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. अशावेळी तिसरी लाट येऊन गोमंतकीयांचे बळी गेल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची राहील असा इशारा दिला. कोरोनाच्या संकटातून गोवा अद्याप सावरलेला नसताना कॅसिनोंवर पोकर स्पर्धा घेण्यास कुणी मान्यता दिली, त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी उपजिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली. तसेच एवढा विरोध असतानाही पोकर स्पर्धा आयोजित केलीच तर सदर प्रकार खपवून घेणार नाहीत, प्रसंगी कॅसिनोवर धडक देऊन सदर प्रकार बंद पाडू, असा इशारा सचिव संकल्प आमोणकर यांनी दिला आहे.
भाजप सरकार असंवेदनशील : काँग्रेस
या आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार आलेक्स लॉरेन्स, युवा अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, महिला अध्यक्ष बीना नाईक, संकल्प आमोणकर, रुडाल्फ फर्नांडिस, जनार्दन भंडारी यांच्यासह अनेक पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. मशाली पेटवून काँग्रेस भवनाजवळ मोर्चा काढण्यात आला. विद्यमान सरकार असंवेदनशील आणि बेजबाबदार असून जनतेला महागाईच्या डोहात ढकलण्यात आल्याची टीका काँग्रेस नेत्यांनी केली. वाढत्या महागाईच्या विरोधात जोरदार आवाज उठवण्यात आला.
कॅसिनोवर चाल करून जाण्याच्या प्रयत्नात दरम्यान, सायंकाळी 6 च्या सुमारास आंदोलन सुरु करण्यात आले. रस्त्यावरच मशाली पेटवण्यात आल्याने बांदोडकर मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक अडवली गेली. कार्यालये सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी वाहनचालकांची गर्दी झाली. त्यामुळे वाहतूक कोंडी आणखीनच वाढली. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांना हटवून रस्त्याच्या बाजूला नेण्याचे प्रयत्न केले. परंतु आंदोलकांची संख्या प्रचंड असल्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आणि बांदोडकर मार्गावर दोन्ही बाजूनी शेकडो वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या. हजारो लोक त्या कोंडीत अडकून पडले. आंदोलनकर्ते कॅसिनोवर चाल करून जाण्याच्या प्रयत्नात होते. पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होते. त्यातूनच लाठीहल्ल्याचा प्रकार घडला व शांततेने चाललेल्या आंदोलनाला तुरळक हिंसेचे गालबोट लागले.









