नगरनियोजन खाते न मिळाल्याने फिरले माघारी : आमदार चर्चिल आलेमाव यांचा दावा
प्रतिनिधी / मडगाव
कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे आपली भाजपाशी जवळीक असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत. दहा काँगेस आमदारांसोबत लॉरेन्स भाजपात प्रवेश करणार होते. पण नगरनियोजन खाते मिळत नसल्याने ते माघारी फिरल्याचा दावा आमदार चर्चिल आलेमाव यांनी केला आहे.
वार्का येथील आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील दावा करून आलेमाव यांनी लॉरेन्स यांच्यावर पलटवार केला आहे. आपण फक्त मुद्यांवर आधारित बाहेरून पाठिंबा भाजपाला दिला आहे. आपल्या मतदारसंघात विकास करण्याचे त्यामागे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
समर्थकांच्या विरोधकामुळे मंत्रिपद नाकारले
आपणास माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर मंत्रिपद देण्यास तयार होते. त्यासाठी पक्षात प्रवेश करण्याची अट नव्हती. आपण समर्थकांना बोलावून विश्वासात घेतले असता 80 टक्के राजी झाले होते. मात्र काहींनी विरोध केल्याने आपण मंत्रिपद न घेतल्याचा दावा आलेमाव यांनी केला आहे.
आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला होता. त्यांच्या वाढदिवसाला मुख्यमंत्र्यांना खास आमंत्रित म्हणून बोलाविण्यात आले होते, याकडे लक्ष वेधून त्यासंदर्भात वर्तमानपत्रात छापून आलेली जाहिरात आलेमाव यांनी दाखविली. यावेळी भाजपात प्रवेश केलेले सर्व 10 आमदार मुख्यमंत्र्यांसह वाढदिवसाला उपस्थित होते हे त्यांनी नजरेस आणून दिले.
कवळेकरांनी दावा न सोडल्याने प्रवेश अडला
बाबू कवळेकर यांनी नगरनियोजन खात्यावरील दावा न सोडल्याने लॉरेन्स यांचा भाजपा प्रवेश अडला, असा दावा आलेमाव यांनी केला. लॉरेन्स यांनी भाजपात प्रवेश केल्यास त्यांना उपमुख्यमंत्रिपद बहाल करण्याची वाच्यता मंत्री मायकल लोबो यांनी या वाढदिवसाच्या पार्टीत केली होती, असाही दावा त्यांनी केला.
आपण केंद्रात खासदार असताना अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते. त्यांना एका मताने सत्ता गमवावी लागली. तेव्हा आपण भाजपाला पाठिंबा दिला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पर्यटन व्यवसाय पुन्हा सुरू करून कोणतीही फायदा झालेला नसून नुकसानच झाले आहे. आपला पर्यटन सुरू करण्यास विरोध होता, याकडे आलेमाव यांनी लक्ष वेधले.









