प्रतिनिधी /वास्को
राज्य आणि केंद्र सरकार जनतेच्या मतांना किंमत देत नाही. आपण ज्या भुमीवर जगतो त्या भुमीलाही सरकार किंमत देत नाही. अशा परिस्थितीत जे कार्यकर्ते लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवत आहेत, ते कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत हा काँग्रेससाठी गर्वाचा क्षण आहे. समाजसेवी कार्यकर्त्याचे काँग्रेसकडे वळणे हे काँग्रेस पक्ष लोकांसाठीच कार्यरत आहे. तो योग्य मार्गानेच वाटचाल करीत आहे हे सिध्द होत असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी दाबोळीत केले.
शुक्रवारी संध्याकाळी दाबोळीतील चिखलीच्या साग मैदानावर दाबोळी गट काँग्रेसने आयोजित केलेल्या मुरगाव तालुका कार्यकर्ता अधिवेशनात काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी बोलत होत्या. या अधिवेशनात गोंयचो आवाज या बिगरसरकारी संघटनेचे निमंत्रक कॅप्टन विरीयेतो फर्नांडिस यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रियंका गांधी यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. त्यांच्या काँग्रेस प्रवेशाला अनुसरूनच बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांच्या हितासाठी कार्यरत असणारे कॅप्टन विरीयेतो सारखे कार्यकर्ते काँग्रेस प्रवेश करतात हा गर्वाचा क्षण आहे. काँग्रेस पक्ष योग्य मार्गानेच वाटचाल करीत असल्याचे सिध्द होत आहे. काँग्रेसचा जनतेशी थेट संवाद आहे. काँग्रेस पक्षासाठी जनता आणि भुमी सर्वाधिक सन्माननिय आहे. पक्ष लोकांच्या मतांना मान देतो. आज केंद्र आणि गोव्यातील सरकारला लोकांच्या मताला किंमत द्यावी असे वाटत नाही. त्यांचे निर्णय हृदयशून्य आहेत. जनतेच्या सुरक्षेचीही त्यांना काळजी नाही. ते इथल्या पर्यावरणाला, ज्या भुमीवर आम्ही उभे आहोत तीला मान देत नाहीत. गोव्यातील नदय़ा, जंगल नष्ट करण्यासाठी ते सरसावलेले आहेत. गोव्याच्या जीवन वाहिनीची त्यांना काळजी नाही. आम्ही लोकांवर उपकार करीत नाही. जनतेची सेवा करणे हे आमचे कर्तव्य आहे. मात्र सरकार जबाबदारी विसरलेले आहे असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
आपण देशाचे दिवंगत पंतप्रधान जे एक वैमानिक होते त्यांची कन्या असून आज अशाच हवाई क्षेत्रातील एका अधिकाऱयांचा आपल्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश होत आहे. कॅप्टन विरीयेतो सारख्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेस पक्ष सशक्त होणार आहे. राज्य सशक्त होणार आहे. त्यांचे विचार आणि मुल्ल्ये काँग्रेस आणि लोकशाहीला सशक्त बनवतील असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
कॅप्टन विरीयेतो फर्नांडिस यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर मनोगत व्यक्त करताना केंद्र आणि राज्य सरकारने गोव्यातील नदय़ांचे केलेले राष्ट्रीयीकरण, रेल्वे दुपदरीकरण, महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारवर टीका केली. यापूर्वीच या सरकारला बाहेर फेकण्यात आले होते. आता पुन्हा वेळ आलेली आहे. हे सरकार केवळ उद्योगतींची मर्जी सांभाळणारे सरकार असून गोवा पुन्हा मुक्त व्हायला हवा असे ते म्हणाले.
या सभेच्या व्यासपीठावर, केंद्रीय नेते पी. चिदंबरम, दिनेश गुंडूराव, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेश अध्यक्ष गिरीष चोडणकर, आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स, माजीमंत्री आलॅक्स सिकेरा, गट अध्यक्ष क्लॅतो डिसोजा, वसंत नाईक, उर्मीला साळगांवकर, संगीता भोसले व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनीही जनतेला संबोधीत केले.









