राज्याचा अपमान झाल्याचे भाजपचे विधान ; काँग्रेस पक्षाची कोंडी
वृत्तसंस्था / गुवाहाटी
आसामच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी तसेच प्रियंका वड्रा तर भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार प्रचार चालविला आहे. काँग्रेसने आसाममध्ये चहाच्या मळय़ांचा मुद्दा प्रचारात लावून धरला आहे. पण एका चुकीमुळे काँग्रेसची कोंडी करण्याची संधी भाजपला मिळाली आहे.
काँग्रेसने राज्यात ‘आसाम बचाओ’ मोहीम सुरू केली असून याकरता एक अधिकृत फेसबुक पेज आणि जाहिरातही तयार करण्यात आली आहे. या जाहिरातीत दाखविण्यात आलेल्या छायाचित्रावरून काँग्रेसवर टीका करण्यात येत आहे. हे छायाचित्र आसामचे नसून तैवानचे असल्याचा दावा भाजपने केला आहे.
आसामचे मंत्री हिमंता विश्व शर्मा यांनी काँग्रेसच्या जाहिरातीतील छायाचित्रांचा स्क्रीनशॉट काढून तो ट्विट केला आहे. काँग्रेसच्या अधिकृत मोहिमेत चहाच्या मळय़ाचे वापरण्यात आलेले छायाचित्र तैवानचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
काँग्रेसचे नेते आसामला ओळखू शकत नाहीत का? हा प्रकार आसाम आणि आमच्या राज्यात चहाच्या मळय़ांमध्ये काम करणाऱयांचा अपमान करणारा असल्याचे म्हणत हिमंता यांनी ‘हॅशटॅग काँग्रेस इन्सल्ट्सआसाम’ प्रसारित केला आहे. काही वेळातच हे व्हायरल झाले असून काँग्रेसवर प्रचंड ट्रोलिंग करण्यात आले आहे. काँग्रेसला आता सारवासारव करावी लागत आहे.









