आठवा आमदारही झाला तयार : लोकसभेसाठी भाजपची रणनीती
विशेष प्रतिनिधी/पणजी
काँग्रेसच्या आठ आमदारांचे होणारे पक्षांतर आता पितृपक्षामुळेच राहिलेले आहे. साधारणतः नवरात्रोत्सवात दसऱया अगोदर या सर्वांचे सिमोल्लंघन होणार आहे.
प्राप्त माहितीनुसार आठवा आमदारही राजी झाला असून आता केवळ पितृपंधरवडा संपण्याची वेळ ही मंडळी पहात आहेत. मंत्रिमंडळातील एक सदस्य आणि दक्षिण गोव्यातील एक बलाढय़ा आमदार हे दोघेजण काँग्रेसमधील आमदारांना अडवित होते. आता जे कोणी फुटणारे आहेत ते सर्वजण एकसंघ झाले आहेत व त्यांनी नवरात्रोत्सवातच सिमोल्लंघन करण्याचा चंग बांधलेला आहे. फुटीरांतील एका नेत्याने सदर माहिती दिली.
वासनिकांनी टाळला गोवा दौरा
काँग्रेसचे केंद्रातील नेते मुकूल वासनिक हे गोव्यात येणार होते आणि त्यानंतर काँग्रेस आमदारांची बैठक घेऊन नवा विधिमंडळ नेता निवडणार होते. परंतु, नवा नेता निवडण्यातही अनेक अडचणी त्यांच्यासमोर उभ्या होत्या. त्यामुळे त्यांनी आपला गोवा दौरा रद्द केला आहे. आता ते देखील पितृपंधरवडा झाल्यानंतर गोव्यात येतील. काँग्रेसच्या बैठकीपूर्वी काँग्रेसचे 8 आमदार हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होते. मात्र काँग्रेसने देखील आपली बैठक टाळली.
आठवा आमदारही झाला तयार
फुटीरांपैकी एका आमदाराला काही लाभांच्या पदासाठी अडवून ठेवले होते. त्यानेही आता अखेर फुटीरांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, आता पितृपंधरवडा सुरू झालेला असल्याने पितृपंधरवडय़ामध्ये शुभ कार्य केले जात नसल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलला आहे.
लोकसभेसाठी भाजपची रणनीती
ऐन नवरात्रोत्सवातील प्रत्येक दिवस हा शुभ मानला जात असल्याने एकतर घटस्थापनादिनी किंवा अन्य कोणत्याही दिवशी दसऱयाच्या अगोदर काँग्रेसचे 8 आमदार हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीचा उद्देश समोर ठेवून भाजपने या सर्व आठही आमदारांना भाजपमध्ये घेण्याचे ठरवले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या निर्णयास मान्यता दिल्याचे वृत्त आहे.
सरकारचे संख्याबळ जाणार 33 वर
या आठजणांच्या पक्ष प्रवेशानंतर भाजप आमदारांचे संख्याबळ 28 होईल. सध्या सरकारला मगोच्या दोन आणि 3 अपक्षांचा पाठिंबा आहे. सत्ताधारी भाजप आघाडीच्या समर्थक आमदारांचे संख्याबळ हे 33 पर्यंत जाईल.








