आज स्वा.वीर सावरकरांची 137 वी जयंती. त्या निमित्ताने या थोर सुपुत्राला आदरांजली.
काँग्रेसने हिंदूंचा उपमर्द करीत साठ वर्षे देशावर राज्य केले असे म्हटले जाते. पण स्वातंत्र्यपूर्व काळात तरी काँग्रेस हिंदूंचा सन्मान करीत होती का? स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर हे एकमेव कट्टर हिंदुत्ववादी नेते होते. मग त्यांनी कितीही यातना भोगल्या, देशासाठी त्याग केला तरी त्यांचा सन्मान काँग्रेस कशी करेल? काय आहे काँग्रेसचा सावरकर द्वेषाचा इतिहास? 1937 साली सावरकरांची स्थानबद्धतेतून सुटका झाल्यानंतर पुण्यातील त्यांच्या अनुयायांनी आणि सावरकरप्रेमींनी त्यांचा भव्य सत्कार आयोजित केला. अर्थातच त्यावेळी ब्रिटिशांचे राज्य होते.
खरेतर ब्रिटिशांविरुद्ध लढणे म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणे. काँग्रेसची स्थापना स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच तर झाली होती. तरीही काँग्रेसने भूमिका घेतली की सरकारी शिक्षा भोगलेल्या व्यक्तींचा सत्कार करणे योग्य नाही आणि फतवा काढला की सत्कार झालाच तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळी निशाणे दाखवून निषेध करावा. त्यावेळी पुण्यात काँग्रेसचे प्राबल्य होते. सावरकरप्रेमी हवालदिल झाले. सावरकर त्याकाळीसुद्धा मोठी असामी होती. सत्कारसभेत बोलायला तेवढय़ाच तोलामोलाचा वक्ता हवा. सत्कारसभेत बोलायला कुणाला बोलवायचे असा प्रश्न निर्माण झाला. मग सावरकरांनाच विचारण्यात आले. सावरकरांनी सांगितले की प्रल्हाद केशव अत्र्यांना बोलवा. इतर कुणीही नको. सभेला प्रचंड गर्दी झाली होती. काँग्रेसचे लोक काळी निशाणे दाखवू लागले. अत्रे उभे राहिले आणि गरजले. दोन काळय़ा पाण्याच्या शिक्षा भोगलेला हा वीरपुरुष तुमच्यासमोर बसला आहे, तो काय ह्या दीडदमडीच्या काळय़ा कारस्थानांना घाबरणार? सभेचा नूरच बदलला. सभेत एकच एल्गार उसळला. काँग्रेसचे कार्यकर्ते काळी निशाणे लपवून मागच्या मागे पळून गेले. याच सभेतील आपल्या भाषणात अत्र्यांनी वि. दा. सावरकर यांना ‘स्वातंत्र्यवीर’ ही पदवी बहाल केली. परंतु गांधींजींच्या स्वभावाचे एक अद्भूत वैशिष्टय़ म्हणजे सर्व मतभेद असूनही त्यांना विरोधकांशी चर्चा करायला आवडायची. त्यांना सुरुवातीपासूनच सावरकर बंधूंबद्दल आस्था होती. त्यांना वाटायचे की सावरकर बंधूंची ऊर्जा अहिंसक प्रतिकाराकडे वळविली गेली तर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला चांगले नेते मिळू शकतील. प्रतिभावान आणि अग्रगण्य लोकांना ओळखून त्यांना राष्ट्रीय चळवळीत सामील व्हावे अशी गांधींची इच्छा होती आणि सावरकर बंधूंबद्दल त्यांचा असाच दृष्टीकोन होता. सावरकरांना अटक करून 1924 मधे जेव्हा गयेच्या तुरुंगात ठेवण्यात आले तेव्हा महात्मा गांधींनी एक पत्रक काढून सावरकरांना वीर संबोधले होते. 2000 साली वाजपेयी सरकारने तत्कालिन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्याकडे सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र तो स्वीकारला गेला नाही. आता राष्ट्रवादी सरकार येऊन सहा वर्षे सावरकारांना भारतरत्न मिळू शकलेले नाही हेही वास्तव आहे. सावरकर हे हिंदुत्ववादी होते म्हणूनच काँग्रेस सतत अगदी त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांना विरोध करते आहे. काही वर्षांपूर्वी राहुल गांधींनी एका जाहीर सभेत सावरकरांच्या तथाकथित माफीनाम्यावर बोलताना नक्कल करून या राष्ट्रभक्ताचा अपमान केला होता. त्यानंतर गेल्या वषी शिळय़ा कढीला ऊत आणत त्यांनी दिल्लीत रामलीला मैदानावर आयोजित ‘भारत बचाओ’ रॅलीत बोलताना काहीही संबंध नसताना सावरकरांना राजकारणात ओढले. ते म्हणाले, ‘सत्य बोललो म्हणून मला माफी मागायला सांगितली जाते. मी काहीही चुकीचे बोललेलो नाही. त्यामुळे मी घाबरणार नाही. माफी मागायला मी कुणी राहुल सावरकर नाही. मी राहुल गांधी आहे.’
अंदमानच्या काळकोठडीत दहा वर्षे यातना भोगल्यावर राजकारणात सहभागी होणार नाही या शर्तीवर इंग्रजांनी त्यांची मुक्तता केली. ही इंग्रजांसमोर शरणागती किंवा माफीनामा नव्हता तर ती एक तात्पुरती व्यवस्था होती.
राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या टीकेला उत्तर देताना वंशपरंपरेने राष्ट्रभक्त असलेल्या सावरकरांचे नातू असलेल्या रणजित सावरकरांनी सडेतोड भाषेत उत्तर दिले होते. ते म्हणाले होते, ‘राहुल गांधींचे नाव राहुल सावरकर नाही, ही चांगली गोष्ट आहे, अन्यथा आम्हा सर्व सावरकरांना तोंड काळे करून फिरावे लागले असते. सावरकरांनी कधीही ब्रिटिशांची माफी मागितली नव्हती. त्यांनी अटी मान्य करून सुटका करून घेतली होती, हे जगजाहीर आहे. सावरकरांनी अटी मान्य केल्या पण कधीही ब्रिटीश राजनि÷sची शपथ घेतली नाही, जी पं. नेहरूंनी घेतली होती.’
जवाहरलाल नेहरूंनी 1946 साली सत्तेच्या मोहापायी व्हॉइसरॉय कौन्सिलमध्ये मंत्रिपद मिळण्यासाठी ब्रिटीशांची आणि ब्रिटीश सम्राट जॉर्ज सहा यांची आणि त्यांचे उत्तराधिकारी यांच्याशी एकनि÷ राहण्याची शपथ घेतली, याची अधिकृत नोंद आहे. ही नि÷ा नेहरूंनी इतकी निभावली की भारत स्वतंत्र झाल्यावर देखील 1950 सालापर्यंत नेहरू किंग जॉर्ज यांना भारताचा सम्राट मानत होते. देशाविषयीचा प्रत्येक निर्णय त्यांच्या परवानगीने घेत होते. पहिले गव्हर्नर जनरल राजाजी यांच्या नेमणुकीची परवानगीदेखील नेहरुंनी किंग जॉर्ज यांच्याकडून घेतली होती. अशी गुलामी प्रवृत्ती असलेल्या पं. नेहरूंच्या पणतवंडाकडून सावरकरांचा अपमान होणे हे नैसर्गिकच. कारण त्यांच्या रक्तातच ती शिकवण आहे. ही पूर्वीची काँग्रेस राहिली नाही. आज ही एका गुलाम वंशाची काँग्रेस झाली आहे.’ ते पुढे म्हणाले होते,
‘कोणी वीर सावरकरांचा अपमान केला तर त्याला भर चौकात फोडून काढू असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अनेकदा म्हणाले आहेत. आता त्यांनी राहुल गांधींनी वीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल त्यांना भर चौकात फोडून काढावे,’
पाच वर्षांपूर्वी राजस्थानमधील भाजप सरकारच्या काळात पाठय़पुस्तकांमधून सावरकरांचा उल्लेख ‘वीर’, ‘महान देशभक्त’ आणि ‘क्रांतिकारी’ असा करण्यात आला होता. त्यानंतर नवीन आलेल्या सावरकरद्वेषी काँग्रेस सरकारने नव्याने तयार केलेल्या अभ्यासक्रमामध्ये सावरकरांसाठी ‘वीर’ शब्द वगळून सावरकरांनी जेलमधील त्रासाला कंटाळून ब्रिटिश सरकारकडे माफी मागितली होती, असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच ते गांधीहत्येच्या कटातही सहभागी होते, असेही सांगण्यात आले आहे.
सावरकर हे खरंच ‘स्वातंत्र्यवीर’ होते का, याबद्दल अनेक मतमतांतरे निर्माण होतील अशी पद्धतशीरपणे त्यांची प्रतिमा निर्माण करण्यात आली. भोपाळमधील काँग्रेस सेवादलाच्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या अधिवेशनात सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्यात लैंगिक संबंध होते असे लिहिलेली पुस्तिका वाटण्यात आली होती. एका वीर पुरुषाच्या बाबतीत टीका करताना काँग्रेसवाले एवढय़ा खालच्या स्तराला जाऊच कसे शकतात? मराठी जनतेनेही असा अपमान खपवून घ्यायला नको होता. इतर कुठल्याही राज्यातील लोक आपल्या नेत्याचा असा अपमान खपवून घेत नाहीत. खरेतर वीर सावरकर हा तळपणारा सूर्य आहे. त्यांच्यावर जे थुंकतील त्यांची थुंकी त्यांच्यावरच पडणार आहे.
विलास पंढरी – 9860613872








