ऑनलाईन टीम / अमरावती :
देशभरात कोरोना पसरविण्याचे काम महाराष्ट्र काँग्रेसने केले आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसदेत केलं होतं. या वक्तव्यावरुन काँग्रेस आक्रमक झाले असून, आजपासून काँग्रेस मोदींविरोधात राज्यभरात माफी मांगे आंदोलन करणार आहे. दरम्यान, या आंदोलनापूर्वीच अमरावतीचे भाजपचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसचे काळे कुत्रे जरी इकडे फिरकले तरी झोडून काढू. एका व्यक्तीसोबत फोनवर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
बोंडे यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे की, ”नाना पटोले म्हणतात, महाराष्ट्रात सगळय़ा भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. भाजपने माफी मागावी. खरे तर छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची या काँग्रेसवाल्यांनीच माफी मागायला पाहिजे. कारण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रमध्ये कोरोनाच्या काळात ते कोणाच्याच कामाला आले नाही, मुख्यमंत्रीही आले नाही. नाना पटोले फिरकले नाही. लोकांना वाऱ्यावर सोडून दिलं. काँग्रेसचे काळे कुत्रे जरी भाजपच्या कार्यालयावर फिरकलं तर त्याला झोडल्या शिवाय भाजपचे कार्यकर्ते राहणार नाहीत.” बोंडे यांच्याया वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.








