लोकांना मदत करण्यासंबंधी पक्षाचे राज्य प्रभारी सुर्जेवाला यांच्याकडून नेत्यांना सूचना
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोना नियंत्रणासाठी प्रदेश काँग्रेसही पुढाकार घेणार असून राज्यातील जनतेला साहाय्य करण्याची तयारी चालविली आहे. यासंबंधी कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीप सुर्जेवाला यांनी मंगळवारी राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली असून सूचना दिल्या आहेत. प्रामुख्याने राज्य पातळीवर पक्षातर्फे कोविड सेंटर आणि कोविड हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
बैठकीप्रसंगी रणदीप सुर्जेवाला यांनी, कोरोना नियंत्रणात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील जनतेची जबाबदारी काँग्रेस पक्षावरही आहे. त्यामुळे प्रदेश काँग्रेस समितीने कंट्रोल रुम आणि हेल्पलाईन सुरू करावी. याद्वारे जनतेला रुग्णवाहिका व इतर सुविधा मिळवून देण्यास साहाय्य करावे. कर्फ्यूमुळे संकटात असणाऱयांच्या घरी जीवनावश्यक वस्तू पोहोचवाव्यात. ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिवीर व इतर आवश्यक औषधे रुग्णांना मिळतील, यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना राज्यातील नेत्यांना दिल्या.
डॉक्टरांना पीपीई किट देणार
काँग्रेस पक्षाशी बांधिलकी असणाऱया डॉक्टरांकडून कोरोनाबाधितांना योग्य वैद्यकीय मार्गदर्शक करावे. डॉक्टरांना पीपीई किट, नागरिकांना सॅनिटायझरची व्यवस्था करावी. ज्या ठिकाणी कोविड रुग्णांना बेड मिळत नाहीत त्या ठिकाणी बेड उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. दोन ते तीन दिवसांत हे उपक्रम हाती घ्यावेत. रोजंदारी कर्मचारी, रिक्षाचालक, व्यापाऱयांना मदत करण्यासाठी विशेष पॅकेज घोषित करण्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणावा, अशा सूचनाही सुर्जेवाला यांनी राज्य काँग्रेस नेत्यांना दिल्या.
विशेष पॅकेजसाठी सरकारवर दबाव बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले, पक्षाचे राज्य प्रभारी रणदीप सुर्जेवाला यांनी कोविड संकट काळात पक्षाने कोणत्या पद्धतीने जबाबदारी पार पाडावी, यासंबंधी सूचना दिल्या आहेत. राज्य पातळीवर कोविड सेंटर निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.









