लखनौ / वृत्तसंस्था
येत्या मार्चमध्ये होणाऱया उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कोणाशीही युती करणार नाही, अशी घोषणा समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांनी केल्यानंतर काँगेसनेही तोच नारा लावला आहे. काँगेसच्या उत्तर प्रदेश शाखेचे अध्यक्ष अजयकुमार लल्लू यांनी काँगेस स्वबळावर लढण्यास सक्षम असल्याचे स्पष्ट केले. ही निवडणूक प्रियांका गांधी यांच्या ‘देखरेखी’त लढविली जाईल. त्यांचे मार्गदर्शन मोलाचे असेल, असे प्रतिपादन लल्लू यांनी रविवारी केले.
उत्तर प्रदेश विधानसभेत काँगेसचे अवघे पाच आमदार आहेत. पण त्यांनी भाजप सरकारला दमवले आहे. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या तुलनेत काँगेसनेच विरोधी पक्ष या नात्याने अधिक प्रखर कामगिरी बजावली, असा दावा लल्लू यांनी केला. राज्यात सध्या बदलाचे वारे वाहत असून निवडणूक जवळ येईपर्यंत या वाऱयांचे वादळात रुपांतर झालेले असेल. हे वादळ काँग्रेसचे असेल, असे भाकितही त्यांनी केले.
राज्यातील जनता काँग्रेसकडे आशेने पाहत आहे. काँगेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. अशा स्थितीत प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वात राज्यात काँगेसचे सरकार स्थापन होईल. त्याला कोणी रोखू शकत नाही. काँगेस पक्ष आतापासूनच तयारीला लागला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.









