वृत्तसंस्था/ जयपूर
राज्य काँगेसमधील लाथाळय़ांमुळे राजस्थानातील जनता त्रस्त आहे. सरकार सध्या स्वतःची कातडी बचावण्यात गुंग असून जनतेच्या हितांकडे कोणीही लक्ष देण्यात तयार नाही. राज्यातील परिस्थितीसंबंधी काही लोक जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचे कार्य करीत आहेत, अशी टीका राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेत्या वसुंधराराजे यांनी शनिवारी केली.
गेले 12 दिवस सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगावर त्यांनी प्रथमच भाष्य केले. आपण भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या असून पक्षाच्या आदेशाप्रमाणे वागत आहोत. कोणीही आपल्यावर काहीही आरोप केले तरी आपण बधणार नाही. पक्षाच्या ध्येयधोरणाप्रमाणे आपली पुढची वाटचाल असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
गेहलोत यांचा दावा
भारतीय ट्रायबल पक्षाच्या दोन सदस्यांनी आपल्याला पाठिंबा दिल्याचा दावा मुख्यमंत्री गेहलोत यांनी केला. या पक्षाने आधी राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे घोषित केले होते. तथापि, या पक्षाच्या दोन विधानसभा सदस्यांनी पक्षादेश मोडून पायलट यांना पाठिंबा दिल्याची घोषणा केल्याचे गेहलोत यांनी स्पष्ट केले. तथापि या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. मात्र त्यांच्या पाठिंब्यानंतर गेहलोत यांनी राज्यपाल भवनात जाऊन राज्यपालांकडे बहुमताचा दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तथापि, पायलट गटाने हा दावा फेटाळला.
गुरूग्राम रिझॉर्टमध्ये पोलीस
शनिवारीच सकाळी राजस्थान पोलिसांनी हरियाणातील गुरूग्राम येथे काँगेस बंडखोर आमदार वास्तव्याला असलेल्या रिझॉर्टवर धाड टाकण्याचा प्रयत्न केला. तथापि, तेथे त्यांना एकही आमदार आढळून आला नाही. पोलिसांच्या आगमनाचे वृत्त कळताच सर्व आमदारांना रिझॉर्टच्या मागच्या दाराने बाहेर काढण्यात आले, असा आरोप नंतर काँगेसने केला. हे आमदार कोठे आहेत याची माहिती भाजप राज्य सरकारने द्यावी, अशीही सूचना करण्यात आली. मात्र, एकही आमदार न सापडल्याने पोलिसांना परत जावे लागले. तीन बंडखोर आमदारांच्या नातेवाईकांनी तक्रार सादर केल्याने राजस्थान पोलिसांनी धाड टाकली होती, असे सांगण्यात आले. यामुळे दोन्ही गटांमध्ये तणाव अधिकच वाढला आहे.
दोन आमदारांची हकालपट्टी
पायलट यांचे समर्थक आमदार भंवरलाल शर्मा आणि विश्वेंद्रसिंग यांची काँगेसने पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व काढून घेण्यात आले आहे. त्यांच्यावर पक्षद्रोह केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून राज्य सरकार अस्थिर करण्याचा आरोपही करण्यात आला आहे. शर्मा हे केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांच्याशी सरकार पाडण्यासंबंधी दूरध्वनीवरून चर्चा करत होते असा आरोप काँगेसने केला. याच चर्चेची ध्वनिफित प्रसारित केली आहे, असेही काँगेसचे म्हणणे आहे. मात्र, शेखावत यांनी आरोप फेटाळला आहे.
न्यायालयाकडे दृष्टी
पायलट यांच्या याचिकेवर राजस्थान उच्च न्यायालयात पुढील सुनावणी येत्या सोमवारी होत आहे. या याचिकेवर न्यायालय कोणता आदेश देते यावर पायलट यांचे पुढचे धोरण ठरेल असे सांगण्यात येत आहे.









