पाच वर्षात काँगेसच्या 170 आमदारांचा पक्षत्याग : 44 टक्के आमदार भाजपात दाखल
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भाजपकडून आमचे आमदार ‘फोडले’ जातात, असा आरोप काँगेस पक्ष नेहमी करत आला आहे. तथापि, काँगेसच्या गळतीचा लाभ केवळ भाजपच नव्हे, तर इतर अनेक पक्षांना मिळाला आहे, असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीवरून दिसून येते. असोसिएशन फॉर डेमॉपेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या गटाने केलेल्या संशोधनातून ही बाब स्पष्टपणे समोर आलेली आहे. इतकेच नव्हे, तर काँगेसमध्ये प्रवेश घेणाऱया आमदारांची संख्याही नगण्य नाही, असे दिसून आले आहे.
2016 ते 2020 या कालावधीत काँगेसच्या 170 आमदारांनी पक्षत्याग केला आहे. यापैकी 44 टक्के (75) आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर 95 आमदारांनी इतर पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. या इतर पक्षांमध्ये प्रामुख्याने स्थानिक किंवा राज्यस्तरीय पक्ष आहेत. याच कालावधीत भाजपच्या केवळ 18 आमदारांनी इतर पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचा विस्तार पाहता ही संख्या इतर राष्ट्रीय पक्षांच्या तुलनेत सर्वात कमी आहे, असे या गटाला आढळून आले आहे.
एकंदर संख्या 405
या चार वर्षांच्या कालावधीत स्वतःचा मूळ पक्ष सोडलेल्या आमदारांची एकंदर संख्या 405 आहे. यापैकी 182 आमदार भाजपमध्ये गेले आहेत. तर काँगेसमध्ये जाणाऱया आमदारांची संख्याही 38 आहे. त्या खालोखाल 25 आमदार तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षात गेले आहेत, अशी महिती देण्यात आली.
खासदारांचाही पक्षत्याग
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या 5 खासदारांनी पक्ष सोडला होता. तर काँगेसच्या सात राज्यसभा सदस्यांनी पक्षत्याग करून अन्य पक्षांमध्ये प्रवेश केला होता. 2016 ते 2020 या कालावधीत पक्षांतर केलेल्या 16 राज्यसभा सदस्यांपैकी 10 जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर पक्षांतर केलेल्या 12 लोकसभा सदस्यांपैकी 5 जण काँगेसमध्ये समाविष्ट झाले, असे हा गट म्हणतो.
महत्वाचा निष्कर्ष
एडीआरने केलेल्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट होते, की केवळ भाजपकडेच अन्य पक्षांमधून किंवा काँगेसमधून आमदार आकृष्ट होतात असे नाही. तर काँगेसमध्ये जाणाऱया आमदारांचीही संख्या मोठी आहे. तसेच भाजपचे खासदारही काँगेस व अन्य पक्षात गेलेले आहे. त्यामुळे ही फुटाफूट सार्वत्रिक आहे. एकाच पक्षावर दोषारोप करता येणार नाही, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.









