प्रतिनिधी / सातारा :
संपूर्ण सातारा जिल्ह्यातील 18 वर्षाच्या प्रत्येक व्यक्तीला लस घेणे क्रमप्राप्त आहे. कोणीही लसीपासून वंचित राहू नये, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. कवचकुंडल या अभियानाच्या माध्यमातून सातारा शहर व जिल्ह्यातील कोणीही लसीपासून वंचित राहणार नाही. याची काळजी आरोग्य विभाग घेत आहे. तरी नागरिकांनी या कवचकुंडल मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी केले आहे.
कस्तुरबा नागरी आरोग्य केंद्र सातारा येथे ठिकाणी सलग 75 तास दि. 10 रोजी सकाळी 10 ते दि. 13 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिशन कवच कुंडल लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. यामध्ये तीन दिवस सलग लसीकरणास येणाऱ्या लाभार्थींना लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपसंचालक डॉ. संजोग कदम, नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के आदी उपस्थित होते.
केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार सातारा जिह्यातील कोव्हिड 19 अंतर्गत लसीकरण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या अंतर्गत सध्या सातारा जिह्यात 18 वर्षावरील सर्व लोकांना कोव्हिड 19 चे मोफत लसीकरण सुरु करण्यात आले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार जिह्यातील मिशन कवच कुंडलअंगर्तत कोव्हिड 19 चे लसिकरण मोहिम दि. 8 ऑक्टोबर 2021 ते 14 ऑक्टोबर 2021 अखेर राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत सातारा जिल्ह्यातील ज्या लाभार्थीचा कोव्हिड लसीकरणाचा पहिला किंवा दुसरा डोस राहेलेला आहे. त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.









