वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय कसोटी संघाचा यष्टिरक्षक वृद्धिमान साहा सध्या धोंडशिरेच्या दुहेरी दुखापतीवर उपचार घेत असून ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्याआधी तो पूर्ण तंदुरुस्त होईल, असा विश्वास बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केला आहे. ही कसोटी मालिका पुढील महिन्यात सुरू होणार आहे.
साहा हा तांत्रिकदृष्टय़ा भारतातील सर्वोत्तम यष्टिरक्षक असल्याचे मानले जाते. संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेवेळी त्याला धोंडशिरेची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला प्लेऑफमध्ये खेळता आले नव्हते. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी सिडनीत दाखल झाला असून कोरोना चाचणीनंतर त्यांनी सरावालाही सुरुवात केली आहे. या दौऱयात एकूण तीन वनडे, तीन टी-20 व चार कसोटी सामने होणार आहेत. प्रथम मर्यादित षटकांच्या मालिकेची सुरुवात 27 नोव्हेंबरपासून होणार असून त्यानंतर कसोटी मालिकेला डिसेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. त्यामुळे साहाच्या उपलब्धतेविषयी इतक्यातच कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे मागील आठवडय़ात बीसीसीआयने म्हटले होते.
‘बीसीसीआयचे कामकाज कसे चालते, याची बहुतेकांना जाणीव नाही, असे दिसते,’ असे गांगुली यांनी द वीक मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत सांगून बीसीसीआयवर होत असलेली टीका फेटाळून लावली. खेळाडूंच्या दुखापतीची हाताळणी बीसीसीआयकडून व्यवस्थित होत नसल्याची टीका मंडळावर झाली होती. रोहित शर्मा, इशांत शर्मा, साहा यांच्या दुखापतींच्या अनुषंगाने ही टीका झाली होती. ‘बीसीसीआयचे ट्रेनर्स, फिजिओ व साहाला स्वतःला धोंडशिरेच्या दोन समस्या असल्याची माहिती आहे. तो कसोटी मालिकेसाठी पूर्ण तंदुरुस्त होऊन उपलब्ध होऊ शकतो, याची जाणीव असल्याने त्याला संघासोबत ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात आले आहे. मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी त्याला निवडण्यात आलेले नाही,’ असे प्रत्युत्तर गांगुली यांनी दिले. ऋषभ पंत हा कसोटीसाठी निवडण्यात आलेला दुसरा यष्टिरक्षक आहे.
रोहित शर्माच्या दुखापतीबाबतही असाच गोंधळ निर्माण झाला होता. त्यालाही आयपीएलवेळी धेंडशिरेची दुखापत झाली होती. त्यामुळे सुरुवातीला त्याला ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी निवडण्यात आले नव्हते. असे असले तरी तो काही सामने संघाबाहेर राहिल्यानंतर मुंबई इंडियन्स संघातून खेळला आणि मुंबई इंडियन्सला त्याने विक्रमी पाचव्यांदा जेतेपदही मिळवून दिले. तो फिट असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी संघात त्याचा समावेश करण्यात आला. मात्र तो 70 टक्केच तंदुरुस्त असल्याने त्याची मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी निवड करण्यात आलेली नाही. फक्त कसोटी संघात त्याला स्थान देण्यात आले आहे, असे गांगुली यांनी स्पष्ट केले.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची मालिका 17 डिसेंबरपासून डे-नाईट कसोटीने ऍडलेडमध्ये सुरू होणार आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली पहिली कसोटी झाल्यानंतर मायदेशी परतणार असल्याने शेवटच्या तीन कसोटीत तो खेळू शकणार नाही.









