भारताविरुद्ध मालिकेच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा अव्वल गोलंदाज पॅट कमिन्सचे प्रतिपादन
ऍडलेड / वृत्तसंस्था
मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेत जी जुगलबंदी रंगली, ती पाहता भारताविरुद्ध आगामी 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत उभय संघात संघर्ष झडला नाही तरच नवल, असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचा अव्वल गोलंदाज पॅट कमिन्सने केले. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी गुरुवार दि. 17 पासून ऍडलेडमध्ये खेळवली जाणार आहे.
‘मालिका जसजशी पुढे सरकत राहील, त्यानुसार, खेळाच्या प्रत्येक दिवशी रोज किमान अर्धा दिवस तरी खेळाडू प्रखर सुर्यप्रकाशाला सामोरे जाताना वर्चस्वाच्या लढाईत देखील अक्षरशः तावून सुलाखून निघतील’, असे पॅट कमिन्सने आभासी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘तसे पाहता, आतापर्यंत ही मालिका मैत्रिपूर्ण वातावरणात पार पडत गेली आहे. काही वेळा गोलंदाजांनी तर काही वेळा फलंदाजांनी मालिकेत रंग भरला आहे. पण, तरी कोणताही संघ व्यावसायिक खेळावरच भर देत असतो. टी-20 व वनडे क्रिकेट मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एकवेळा बाजी मारली. मात्र, आता कसोटी क्रिकेटमधील निर्णायक युद्धाला सुरुवात होणार असून त्यात उभय संघात पराकोटीचा संघर्ष झडला नाही तरच मला नवल वाटेल’, याचा त्याने पुढे उल्लेख केला.
मागील दशकभरात जागतिक स्तरावरील प्रत्येक अव्वल गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत आलेल्या विराट कोहलीला गोलंदाजी करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे कमिन्सने एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. ‘मागील आठवडय़ातच मी केन विल्यम्सनचे झळकावलेले दमदार द्विशतक पाहिले आहे. स्टीव्ह स्मिथसारख्या दिग्गज फलंदाजाला येथे सामोरे जाण्याची माझ्यावर वेळ येणार नाही, याची मला कल्पना आहे. पण, विराट कोहलीही अव्वल दर्जाचा फलंदाज आहे आणि त्याच्याशी जुगलबंदी रंगू शकते’, असे तो म्हणाला.
‘ग्लेन मॅकग्रा-ब्रायन लारा यांच्यातील जुगलबंदी पाहत मी घडलो. कोणाची सरशी होते, हे पाहण्यासारखे असायचे. या हंगामात आम्ही एकमेकांना भिडू, त्यावेळी देखील अशीच चुरस असेल’, याचा त्याने येथे उल्लेख केला. पॅट कमिन्सला ऑस्ट्रेलियाचा भावी कसोटी कर्णधार म्हणून पाहिले जाते आणि तो स्वतः देखील ही बाब नाकारत नाही.
‘सर्व क्रिकेट प्रकार पाहता, कसोटी क्रिकेटमध्ये एखाद्या गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेतृत्व भूषवणे अधिक सोपे असते. अर्थात, केवळ आगामी मालिकेपुरते बोलायचे तर खेळपट्टी फलंदाज व गोलंदाज या दोन्ही घटकांना तितकीच पोषक असावी, अशी माझी अपेक्षा आहे. कसोटी सामना असेल आणि एखादा संघ 600 धावांपर्यंत ठाण मांडून राहत असेल तर असा सामना फार प्रेक्षक पाहतील, असे मला वाटत नाही. भारतीय संघात चेतेश्वर पुजारासारखे खेळाडू मात्र कस पाहतील. वास्तविक, अशा फलंदाजासमोर गोलंदाजांची कसून पारख होत असते’, असे कमिन्सने शेवटी नमूद केले.
यापूर्वी झालेल्या सराव सामन्यात पुजाराला ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मायकल नासीरने त्रिफळाचीत केले आणि त्या सामन्यातील क्षणचित्रे आपण पाहिली असल्याचे कमिन्स येथे म्हणतो. बोर्डर-गावसकर चषक स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स व सोनी टेन 3 वाहिनीवरुन प्रसारित केले जाणार आहे.









