ऑस्ट्रेलिया दुसऱ्या, इंग्लंड तिसऱ्या स्थानावर
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीच्या कसोटी संघांच्या वार्षिक मानांकनात भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत अग्रस्थान पटकावले आहे. मे 2020 पासून झालेल्या सर्व मालिकांचा आढावा घेतल्यानंतर ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.
मार्च 2020 मध्ये भारताला न्यूझीलंडकडून 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. पण मे 2020 पासून झालेल्या मालिकांचा विचार करण्यात आला असल्याने भारताचे मानांकन गुण 119 वरून 121 वर पोहोचले आहेत. मे 2022 च्या आधी झालेल्या मालिकांचा आढावा घेताना 50 टक्के तर त्यानंतरच्या मालिकांचा 100 टक्के मानांकन गुणांसाठी विचार केला गेला आहे. डिसेंबर 2021 मध्ये महिनाभर भारतीय संघ या क्रमवारीत अग्रस्थानी होता.
ऑस्ट्रेलियन संघाची मात्र 122 वरून 116 रेटिंग गुणांवर घसरण झाली आहे. 2019-20 मध्ये पाकिस्तान (2-0) व न्यूझीलंड (3-0) यांच्याविरुद्ध त्यांनी मालिका जिंकल्या होत्या. पण या मालिकांना आता जमेत धरण्यात येत नसल्याने त्यांची ही घसरण झाली आहे तर 2021-22 मध्ये इंग्लंडवर त्यांनी 4-0 असा विजय मिळविला होता, मानांकनासाठी त्याचा 50 टक्के विचार करण्यात आला आहे. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम लढत लंडनमध्ये होणार आहे.
ऑस्ट्रेलिया संघ जानेवारी 2022 पासून अग्रस्थानावर होता. इंग्लंडवर 4-0 असा विजय मिळविल्यानंतर न्यूझीलंडला मागे टाकत त्यांनी हे अग्रस्थान मिळविले होते. इंग्लंड संघ या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावरील संघांच्या गुणांतील अंतर 13 वरून 2 गुणांवर आले आहे. अन्य संघांच्या क्रमवारीतही फारसे बदल झालेले नाहीत. मात्र 10 व्या स्थानावरील झिम्बाब्वेने 5 रेटिंग गुण मिळविले आहेत. अफगाणिस्तान व आयर्लंड यांनी पुरेशा कसोटी खेळलेल्या नसल्यामुळे त्यांना या मानांकनात अद्याप स्थान मिळालेले नाही.
पुरुषांच्या टी-20 सांघिक मानांकनात भारताने आपले अग्रस्थान भक्कम केले असून दुसऱ्या स्थानावरील इंग्लंडपेक्षा आठ गुणांनी ते आघाडीवर आहेत. न्यूझीलंडने पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका यांना मागे टाकत तिसरे स्थान मिळविले आहे. वनडे मानांकनाची यादी वार्षिक अपडेटनंतर 10 मे रोजी पाक-न्यूझीलंड मालिका संपल्यानंतर जाहीर करण्यात येणार आहे.









