अनुभवी चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणेऐवजी शुभमन गिल, हनुमा विहारीला दीर्घकालीन संधीचे संकेत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्वाची धुरा स्वीकारण्यासाठी सज्ज झाला असताना भारतीय क्रिकेट संघाच्या मध्यफळीत देखील नव्या फेररचनेचे स्पष्ट संकेत आहेत. या हंगामातील उर्वरित 3 कसोटी सामन्यांसाठी रहाणे व पुजारा यांना संघात स्थान मिळणार नाही, हे निश्चित असून त्यांच्याऐवजी शुभमन गिल व हनुमा विहारी यांना प्रदीर्घ कालावधीसाठी संधी देण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. श्रेयस अय्यर हा यात बॅकअप असेल, असे सूत्रांकडून समजते. भारतीय संघ या हंगामात श्रीलंकेविरुद्ध मायभूमीत 2 व इंग्लंडविरुद्ध त्यांच्या भूमीत 1 असे आणखी 3 कसोटी सामने खेळणार आहे.
भारताने यापूर्वी केपटाऊनमध्ये आपला शेवटचा कसोटी सामना खेळला, त्यातील दोन जागा आता रिक्त असतील, हे निश्चित आहे. मोहालीत विराट आपला 100 वा कसोटी सामना खेळत असताना आणखी किमान 3 युवा खेळाडू संघाचे दरवाजे ठोठावत असतील, हे देखील स्पष्ट आहे. मात्र, पुजारा व रहाणे असे दोन खेळाडू मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले जात असताना गिल, विहारी व अय्यर यांच्यापैकी कोण दोघे समाविष्ट असतील, हा आता खरा कळीचा प्रश्न असेल. लंकेविरुद्ध पहिली कसोटी दि. 4 मार्चपासून खेळवली जाणार असून त्यापूर्वी अंतिम एकादशच्या माध्यमातून निवडी निश्चित होणे अपेक्षित आहे.

शुभमन गिल आता कसोटी क्रिकेटमध्ये नवी गरुडझेप घेण्यासाठी सज्ज असून गोलंदाजांवर तुटून पडण्याची त्याची क्षमता महत्त्वाची ठरु शकते. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड त्याला मध्यफळीत उतरवण्याची दाट शक्यता आहे. रोहित शर्मा-मयांक अगरवाल सलामीला उतरतील आणि शुभमन गिल तिसऱया स्थानी उतरेल, असे सध्याचे संकेत आहेत.
‘तिसऱया क्रमांकावर फलंदाजीसाठी शुभमन हा भारताचा सर्वोत्तम पर्याय ठरु शकतो. त्याने यापूर्वी सलामीला फलंदाजी केली असली तरी रोहित व मयांक सलामीला उतरत असल्याने तेथे फारशी चिंता नाही. आता तिसऱया स्थानाची महत्त्वाची जबाबदारी चोख पार पाडण्यासाठी शुभमन सक्षम वाटतो’, असे माजी निवडकर्ते व माजी कसोटी सलामीवीर देवांग गांधी याबाबत वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. ऑस्ट्रेलियात सलामीवीर या नात्याने कसोटी पदार्पण करण्यापूर्वी गिलला मध्यफळीसाठी तयार केले जात होते, असा खुलासा देखील देवांग यांनी केला. देवांग जानेवारी 2021 पर्यंत राष्ट्रीय निवड समितीत कार्यरत होते.
‘भारत अ संघाच्या माध्यमातून शुभमनची उत्तम पारख करण्यात आली आहे. विंडीजमध्ये विंडीज अ संघाविरुद्ध त्याने मध्यफळीत फलंदाजीला उतरत शानदार द्विशतक झळकावले. शिवाय, कसोटीत सलामीला फलंदाजी केली असल्याने तिसऱया स्थानी देखील तो नव्या चेंडूला आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकतो’, असे देवांग तपशीलवार बोलताना म्हणाले.
सध्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला गेलेला अजिंक्य रहाणे पाचव्या स्थानी उतरत असे. त्याच्याऐवजी विस्फोटक फलंदाजीची क्षमता असलेल्या रिषभ पंतला प्रदीर्घकालीन संधी देण्याचा व्यवस्थापनाचा विचार आहे. या परिस्थितीत विहारी सहाव्या स्थानी उतरेल.
‘सध्या आघाडी फळीत मयांक, रोहित, शुभमन व विराट हे सर्व उजवे फलंदाज आहेत. त्यामुळे, पाचव्या स्थानी एखादा डावखुरा फलंदाज उतरवता आला तर लेफ्ट-राईट कॉम्बिनेशनच्या माध्यमातून वैविध्य आणता येऊ शकते. त्यानंतर विहारी सहाव्या स्थानी व नंतर सातव्या स्थानी पुन्हा डावखुरा फलंदाज-जडेजा असे कॉम्बिनेशन असू शकते’, असा देवांग यांचा होरा आहे.
विहारी सहाव्या स्थानीच!
विहारीचे फलंदाजी तंत्र पुजाराशी मिळतेजुळते असल्याने त्याला सहाव्या स्थानाऐवजी तिसऱया स्थानी खेळवणे रास्त ठरेल का, यावर देवांग गांधी यांनी नकारार्थी उत्तर नोंदवले. ते म्हणाले, ‘विहारीने मायदेशात एकमेव कसोटी खेळली आहे. याशिवाय, भारतीय व भारत अ संघातर्फे विदेशात त्याने पाचव्या स्थानी अधिक फलंदाजी केली. आता सहाव्या स्थानी तो फलंदाजीला उतरेल, त्यावेळी फिरकीपटू अधिक गोलंदाजी करत असतील आणि एसजी टेस्ट बॉल बराच जुना झालेला असतो. रणजीमध्ये विहारीने फिरकीविरुद्ध उत्तम फलंदाजी केली आहे आणि ही बाब व्यवस्थापनाने हेरलेली असू शकते’.
शुभमन गिल तिसऱया, पंत 5 व्या, विहारी 6 व्या स्थानी शक्य
सध्या भारतीय क्रिकेट मंडळ व्यवस्थापनात सुरु असलेल्या चर्चेनुसार, आगामी कालावधीत कसोटी क्रिकेट प्रकारात शुभमन गिल तिसऱया, रिषभ पंत पाचव्या व हनुमा विहारी सहाव्या स्थानी उतरतील, असे संकेत आहेत. पुजारा व रहाणे हे दोन्ही अनुभवी फलंदाज प्रदीर्घ कालावधीपासून बॅड पॅचमधून जात असल्याने त्यांना वगळून ही जबाबदारी यंग ब्रिगेडकडे दिली जाणार, हे यापूर्वीच स्पष्ट झाले होते.
पदार्पणातील शतकवीर श्रेयस अय्यरला तूर्तास संधी नाही?

आपल्या कसोटी पदार्पणात धडाकेबाज शतक झळकावणाऱया श्रेयस अय्यरला नव्या फेररचनेत मात्र कुठेही जागा मिळू शकणार नाही, असे सध्याचे संकेत आहेत. शुभमन गिल व विहारी यांनी श्रेयस अय्यरपूर्वी कसोटी क्रिकेट खेळले असल्याने द्रविड-रोहित यांचे प्राधान्य गिल-विहारी यांनाच असेल, असा होरा आहे. मात्र, या दोघांपैकी कोणी दुखापतीमुळे बाहेर फेकले गेले तर पहिली पसंती श्रेयस अय्यरला मिळू शकते. श्रेयस अय्यरने आपल्या कसोटी पदार्पणात न्यूझीलंडविरुद्ध 105 धावांची शतकी खेळी साकारली होती.
तिन्ही खेळाडूंच्या कसोटी कारकिर्दीवर दृष्टिक्षेप
फलंदाज / कसोटी / धावा / सरासरी / सर्वोत्तम / शतके-अर्धशतके
हनुमा विहारी / 13 / 684 / 34.20 / 111 / 1-4
शुभमन गिल / 10 / 558 / 32.82 / 91 / 0-4
श्रेयस अय्यर / 2 / 202 / 50.50 / 105 / 1-1.









