दुबई : भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी कसोटी जिंकून पुढील वर्षी होणाऱया आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरीत खेळण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. बुधवारी आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी मानांकनात भारताने दुसरे स्थान कायम राखले आहे.
दुसरी कसोटी 8 गडय़ांनी जिंकून भारताने 30 गुण मिळविले असून एकूण 390 गुण आणि 72.2 टक्केवारी गुणांसह दुसरे स्थान राखले आहे. ऑस्ट्रेलियाने दुसरी कसोटी गमविली असली तरी त्यांचे अग्रस्थान कायम राहिले असून षटकांची गती न राखल्याबद्दल त्यांना चार मानांकन गुणांचा दंड झाला आहे. त्यांचे आता 322 गुण झाले असून त्यांची गुणांची टक्केवारी 76.6 इतकी आहे. न्यूझीलंडने मानांकनातील तिसरे स्थान आणखी भक्कम केले आहे.
या विजयाचे त्यांना 60 गुण मिळाले असून त्यांची गुणांची टक्केवारी 66.7 इतकी आहे. ‘न्यूझीलंडने पाकविरुद्धची कसोटी जिंकून कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत खेळण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत,’ असे आयसीसीने म्हटले आहे. इंग्लंड व पाकिस्तान डब्ल्यूटीसी मानांकनात अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत.
साखळी फेरीच्या समाप्तीनंतर गुणांच्या टक्केवारीत आघाडीवर राहणाऱया दोन संघांत पुढील वर्षी अंतिम लढत होणार आहे. साखळी फेरीतील प्रत्येक मालिकेसाठी 120 गुण ठेवण्यात आले असून मालिकेतील सामन्यानुसार त्यांची विभागणी केली जाते. दोन सामन्यांच्या मालिकेत प्रत्येक कसोटीस 60 तर पाच सामन्यांच्या मालिकेत प्रत्येक कसोटीस 24 गुण दिले जातात. एकूण गुणांच्या बाबतीत भारताचे सर्वाधिक गुण असले तरी कोरोना महामारीच्या कारणास्तव बऱयाचशा मालिका रद्द झाल्यामुळे आयसीसीने गेल्या महिन्यात डब्ल्यूटीसीच्या गुणपद्धतीत थोडासा बदल केला आहे. त्यामुळे आता गुणांच्या टक्केवारीनुसार प्रत्येक संघाची क्रमवारी ठरविण्यात येत आहे. यामुळेच भारताचे गुण जास्त असले तरी टक्केवारी गुणांच्या आधारे त्यांना दुसरे स्थान मिळाले आहे.
विश्व कसोटी चॅम्पियनशिप (2019-2021) गुणतक्ता
संघ टक्केवारी गुण मालिका विजय हार ड्रॉ
ऑस्ट्रेलिया 76.6 322 4 8 3 1
भारत 72.2 390 5 8 3 0
न्यूझीलंड 66.7 360 5 6 4 0
इंग्लंड 60.8 292 4 8 4 3
पाकिस्तान 34.6 166 4.5 2 4 3
द.आफ्रिका 28.0 84 3 2 6 0
लंका 26.7 80 3 1 3 1
विंडीज 11.1 40 3 1 6 0
बांगलादेश 0.0 0 1.5 0 3 0.
(30 डिसेंबरअखेर)









