आयसीसी कसोटी मानांकन- क्विन्टॉन डी कॉक टॉप टेनमध्ये, कोहली पाचव्या स्थानी
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीने बुधवारी कसोटी मानांकन यादी जाहीर केली असून भारताच्या रविंद्र जडेजाने अष्टपैलूंमध्ये पुन्हा अग्रस्थान मिळविले आहे तर द.आफ्रिकेच्या क्विन्टॉन डी कॉकने कसोटी फलंदाजांच्या यादीत पुन्हा एकदा टॉप टेनमध्ये स्थान मिळविले आहे.
विंडीजचा माजी कर्णधार जेसॉन होल्डरला 28 रेटिंग गुण गमवावे लागल्याने अष्टपैलूंच्या यादीतील अग्रस्थानही त्याला गमवावे लागले आहे. भारताच्या जडेजाने त्याला मागे टाकत त्याच्या अव्वल स्थानावर ताबा मिळविला आहे. त्याने एकूण 386 रेटिंग गुण मिळविले आहेत. यापूर्वी ऑगस्ट 2017 मध्ये जडेजाने अग्रस्थान पटकावले होते. होल्डर 384 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. विंडीजविरुद्ध नुकतीच झालेली कसोटी मालिका द.आफ्रिकेला 2-0 अशी एकतर्फी जिंकून देण्यात मोलाची कामगिरी करणाऱया डी कॉकने दोन स्थानांची प्रगती करीत दहावे स्थान मिळविले आहे. 18 महिन्यांच्या खंडानंतर तो पुन्हा एकदा टॉप टेनमध्ये आला आहे. यापूर्वी डिसेंबर 2019 मध्ये तो टॉप टेनमध्ये होता. त्यावेळी त्याने सहावा क्रमांक मिळविला होता आणि मानांकनातील तीच त्याची आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
द.आफ्रिकेचा आणखी एक फलंदाज कर्णधार डीन एल्गारनेही एका स्थानाची प्रगती करीत 19 वा क्रमांक मिळविला आहे. त्याने विंडीजविरुद्धच्या दुसऱया कसोटीत 77 धावांची खेळी केली होती. याच संघातील रासी व्हान डर डय़ुसेननेही तब्बल 31 स्थानांची प्रगती केली असून दुसऱया डावात नाबाद 75 धावांची खेळी केल्याने तो आता 43 व्या स्थानावर पोहोचला आहे. गोलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाने एका स्थानाची प्रगती करीत सहावे स्थान मिळविले आहे तर स्पिनर केशव महाराजने दुसऱया डावात हॅट्ट्रिकसह पाच बळी मिळविल्याने त्याला तीन स्थानांची बढती मिळाली. तो आता 28 व्या स्थानावर आहे. द.आफ्रिकेतर्फे 61 वर्षाच्या खंडानंतर पहिली कसोटी हॅट्ट्रिक नोंदवण्याचा मान त्याने मिळविला. या सामन्यात त्याने एकूण 7 बळी मिळविले. लुन्गी एन्गिडीनेही तीन क्रमांकाची बढती मिळवित 41 वे स्थान घेतले आहे.
विंडीजचा फलंदाज जर्मेन ब्लॅकवूडने बारा स्थानांची प्रगती करीत 44 वे तर शाय होपने तीन स्थानांची प्रगती करीत 82 वे आणि किरेन पॉवेलने सहा स्थानांची बढती मिळवित 94 वे स्थान घेतले आहे. वेगवान गोलंदाज केमार रॉशने सात बळी मिळविल्याने टॉप टेनच्या दिशेने आगेकूच करीत आहे. त्याने गोलंदाजांच्या क्रमवारीत एका स्थानाची प्रगती करीत 12 वे स्थान मिळविले आहे. काईल मेयर्सनेही बढती मिळवित 53 वे स्थान घेतले आहे. त्याने दोन्ही डावात 3-3 बळी मिळविले होते.
ताज्या क्रमवारीतही ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ 891 गुणांसह अग्रस्थानी, केन विल्यम्सन 886 गुणांसह दुसऱया, मार्नस लाबुशाने 878 गुणांसह तिसऱया, विराट कोहली 814 गुणांसह चौथ्या, जो रूट 797 गुणांसह पाचव्या, रोहित शर्मा 747 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. रिषभ पंतचेही रोहित इतकेच गुण आहेत, पण तो सातव्या स्थानावर आहे. हेन्री निकोल्स, डेव्हिड वॉर्नर, क्विन्टॉन डी कॉक त्यापुढील स्थानावर आहेत.









