विशेष प्रतिनिधी/ देवरुख
संगमेश्वरजवळील कसबा गावातील कालभैरव मंदिराजवळच असणारे ज्ञानवापी तिर्थकुंड हे पवित्र ठिकाण असतानाही शासकीय उदसिनतेच्या शापामुळे हा परिसर अजूनही दुर्लक्षीत राहिला आहे.
कसबा हे गाव हेमाडपंथी शिवमंदिरांसाठी प्रसिध्द आहे. मात्र यातील सर्वच मंदिरे दुर्लक्षीत असल्याने त्यांची सध्या दुरवस्था झाली आहे. कसबा हा परिसर मार्लेश्वर परिसराच्या धर्तीवर मोठे पर्यटनस्थळ होण्याच्या दृष्टीने आजवर कधी प्रयत्नच झाले नाहीत. स्थानिक लोकप्रतिनीधींची उदासिनता आणि पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष यामुळेच हा प्रकार घडला आहे. कसबा गावातील कर्णेश्वर, संगमेश्वर आणि सूर्यनारायण मंदिर वगळता उर्वरित सर्व मंदिरे जमिनदोस्त झाली आहेत.
विश्वस्त मंडळाच्या प्रयत्नाने याच परिसरात असलेले कालभैरवाचे मंदिरही सुंदर आहे. या मंदिराचा परिसर सुंदर यात्रास्थळ बनणे शक्य असताना उदासिनतेमुळे आज हा परिसर यात्रास्थळाच्या विकासापासून वंचित राहिला आहे. या ठिकाणी असणाऱया ज्ञानवापी तिर्थकुंडाविषयी सांगितली जाणारी आख्यायीकाही मोठी रंजक आहे. मोगलांकडून सातत्याने हिंदूच्या मंदिरांवर हल्ले करून नुकसान केले जात होते. त्या काळात शिवमंदिरांमधील शिवलिंग सुरक्षीत राहावे या उद्देशाने लिंगायत घराण्याच्या महापुरूषाने परिसरातील मंदिरांमध्ये असणारी शिवलिंगे मोगल आकमणापासून वाचविण्यासाठी विहीरीत टाकली. त्यामुळेच ही शिवलिंगे सुरक्षीत राहिली. पाच नद्यांचे पाणी जसे पवित्र मानण्यात आले आहे. तेवढेच महत्व या ज्ञानवापीमधील तीर्थाला आहे.
शिलाहार काळातील तक्षराजाने या तीर्थकुंडाचे बांधकाम केले. तीर्थकुंडाच्या एकदम तळाशी शिवलिंग आहेत. या तीर्थकुंडातील पाणी बाराही महिने कायम असते. याचे महात्म्य लक्षात घेता या परिसराला यात्रास्थळाचा दर्जा मिळणे गरजेचे आहे. मात्र अद्याप मुख्य रस्त्यापासून कालभैरव मंदिरापर्यंत जाण्याकरिता डांबरी रस्ता होऊ शकलेला नाही. या परिसराच्या डागडुजीसाठी कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही. कालभैरव मंदिराच्या विश्वस्त कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि गामस्थ करतात तेवढीच देखभाल येथे सुरू आहे. या पौराणिक महत्व प्राप्त झालेल्या वास्तू आता नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने पुरातत्व खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. कालभैरव मंदिराजवळ विश्वस्त कमिटीच्या वतीने भक्तनिवास बांधण्यात आले आहे. यात्रेप्रंसगी बाहेरून येणारे तसेच नियमित या परिसराला भेट देण्यासाठी येणाऱया पर्यटक आणि भाविकांची निवासाची सोय व्हावी असा चांगला उद्देश या बांधकामामागे आहे. या परिसराचा विकास करण्यासाठी विश्वस्त समिती प्रयत्नशिल आहे.









