कसबे डिग्रज / वार्ताहर
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातुन कसबे डिग्रजच्या नळ पाणीपुरवठा योजनेस मान्यता मिळाली असून यासाठी ४ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जल जीवन मिशन अंतर्गत सदरची योजना मंजूर झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आनंदराव नलवडे यांनी दिली.
लोकसंख्या व विस्ताराने मोठे आणि कृष्णा काठावरील एक सधन गाव म्हणून कसबे डिग्रज गावची ओळख आहे. सध्यस्थितीत चालू असणारी पाणीपुरवठा यंत्रणा ही जवळपास चाळीस वर्षांपूर्वीची असल्याने ही यंत्रणा कालबाह्य झालेली आहे. यंत्रणा कालबाह्य झाल्यामुळे गावांत दूषित पाणीपुरवठा होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईन गळती लागल्याने सदरची गळती काढण्यासाठी फार मोठा त्रास व आर्थिक फटका ग्रामस्थांना बसत आला आहे. सध्या गावचा विस्तार हा झपाट्याने वाढत असल्याने संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करणं हे ग्रामपंचायतीला अशक्य गोष्ट झालेली होती. या सर्व गोष्टींसह गावच्या लोकसंख्येचा विस्तार पाहता गावामध्ये नविन अंतर्गत पाईपलाईन व्हावी यासाठी ग्रामस्थांतून अनेक वर्षांपासून मागणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ग्रामस्थांची गरज लक्षात घेऊन सदरची योजनेसाठी निधी देऊन दिलासा दिला आहे. गावची अंतर्गत पाईपलाईनसाठी पाच वर्षे सातत्याने पाठपुरावा सुरू असून लवकरच या कामाची सुरुवात होणार असल्याची माहिती आनंदराव नलवडे यांनी दिली.