कसबा बीड /प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील सोन्याचा पाऊस पडणारे गाव,असे प्राचीन करवीर काशी ग्रंथात उल्लेख असणारे कसबा बीड या गावाला भेट देताना गावच्या पर्यटनाच्यादृष्टीने भोज राजाची राजधानी असलेल्या बीड गावकऱ्यांचा प्राचीन शिलालेख ,वीरगळ आदी ऐतिहासिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
ऐतिहासिक वारसा असलेले कसबा बीड या गावांमध्ये प्राचीन शिलालेख,वीरगळ आदी पाहून ते अचंबित झाले, त्याबरोबरच शिवारात अस्ताव्यस्त पडलेले वीरगळ पाहून त्यांनी खेदही व्यक्त केला. त्यांनी जवळपास दोन तास महादेव मंदिर, गणेश तलाव, लक्ष्मी तलाव या ठिकाणी प्रत्येक्ष जावून येथील ऐतिहासिक माहिती जाणून घेतली. यावेळी तहसीलदार शितल मुळे-भांबरे उपस्थित होत्या. गावाचे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा हा वारसा आबादीत रहावा, तसेच येथील प्राचीन शिलालेख व विरगळ एकत्र करुन भव्य ‘विरगळ पार्क’ करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी गावातील तलावातील व गावरान जमिनीवरील अतिक्रमण लोकांनी थांबविले पाहिजे. यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने कृती आराखडा बनवून सादर करावा विकासासाठी भरघोस निधी आपण देऊ असे आश्वासन जिल्हाधिकारी देसाई यांनी ग्रामस्थांना दिले.
गावाच्या वैभवशाली इतिहासाची माहिती डॉ.अमरजा निंबाळकर, राजाराम वरूटे व यंग ब्रिगेड सुवर्ण राजधानी तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. यावेळी तहसीलदार शितल मुळे-भांबरे उपस्थित होत्या.तसेच तलाठी एन.पी.पाटील, सर्कल प्रविण माने, माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी, अमित वरूटे, रोहिणी वरूटे, डी.एम.सुर्यवंशी, प्रकाश तिबीले, पोलीस पाटील पंढरीनाथ ताशिलदार, सचिन वरूटे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.