डाव्या विचारांच्या आघाडीत निर्माण झाली पोकळी
कसबा बीड /प्रतिनिधी
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, महाराष्ट्र किसान सभेचे सरचिटणीस, वा कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन कॉम्रेड नामदेव गावडे (वय 63) यांचे आज हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय कम्युनिस्ट पक्ष व डाव्या विचाराच्या आघाडी मध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. शेतकरी नेते नामदेवराव गावडे विद्यार्थिदशेपासूनच कम्युनिस्ट चळवळीत सहभागी होते. राज्य व राष्ट्रीय पातळीवर ऑल इंडिया युथ फेडरेशनचे नेतृत्व करत युवकांचे संघटन उभे केले.|
महाराष्ट्रामध्ये गोविंदराव पानसरे यांच्या तालमीत शिकलेले नामदेवराव गावडे यांनी पानसरे यांच्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे व महाराष्ट्र किसान संघटना यांची मशाल हाती घेतली होती. युवक व कामगार यांच्या अनेक प्रश्नांसाठी त्यांनी मोर्चे व आंदोलने करून आवाज उठवला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ता बनवून कामगार व शेतकरी वर्गासाठी आपले जीवन समर्पित केले. अशा हा समाजाभिमुख असणारा नेता अनंतात विलीन झाला.
यावेळी कै.गावडे यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी-कॉम्रेड राम बाहेती, औरंगाबादठाणे उदय चौधरी, नामदेव चव्हाण जिल्हा बीड, सुभाष लांडे, दिलीप पोवार, सतीश कांबळे, कोल्हापूर, डी.एम. सुर्यवंशी, निरज हत्तेकर सांगली,शाम चिंचणे सातारा, विजय बचाटे सांगली, सुभाष लांडे अहमदनगर, शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देवकर, गोकुळचे माजी संचालक सत्यजीत पाटील, शामराव सूर्यवंशी, ‘कुंभी-कासारी’चे माजी व्हा.चेअरमन दादासो लाड, संचालक उत्तम वरूटे, सरपंच दिनकर गावडे, अमित वरूटे, माजी पंचायत समिती सुनिल पाटील, जि.प.सदस्य सुभाष सातपुते, सर्व ग्रामस्थ तसेच महाराष्ट्र किसान संघटना, कामगार संघटना, कम्युनिस्ट पक्षाचे पदधिकारी, लाल बावटा संघटना पदाधिकरी, कोल्हापूर, सांगली, सातारा भागातील सर्व मान्यवर व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.